राजीव सातव यांच्या आठवणीत राहुल गांधी भावूक; म्हणाले, तो सतत जनतेबद्दल बोलायचा...

दुःख झालं कारण, तो माझा मित्र होता...
Rahul gandhi - Rajeev Satav
Rahul gandhi - Rajeev Satav Mumbai Tak

हिंगोली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात सातवा दिवस आहे. कन्याकुमारी ते कश्मीर अशी सुरु असलेली यात्रा सध्या हिंगोलीमध्ये आहे. या दरम्यान, हिंगोलीमध्ये पोहचताच राहुल गांधी यांना त्यांचा मित्र आणि दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकर्षाने कमतरता जाणवली. कॉर्नर सभेत बोलतानाही राहुल गांधी यांनी भावूक होऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राहुल गांधी म्हणाले, मी जेव्हा इथे आलो तेव्हा वाटलं की ते पण अशाच बैठकीत आपल्या सोबत बसले असते. त्यामुळे दुःख झालं. दुःख झालं कारण, तो माझा मित्र होता. काम चांगलं करायचा. पण त्यापेक्षाही जास्त दुःख झालं कारण, मला माहिती आहे, तुमचा आवाज राजीव सातवच्या तोंडून यायचा. तो जेव्हाही मला भेटायचा, तेव्हा तुमच्या प्रश्नांबद्दल बोलायचा. तुमच्या बद्दल सांगायचा. त्याने आपल्याबाबत कधीच माझ्यासोबत बोलला नाही. त्यामुळे दुःख आहे.

पण आनंदी देखील आहे, की मी इथे आहे. माझ्या मित्राच्या कर्मभुमीत आहे. आनंद आहे की त्यांची पत्नी पदयात्रेत आज माझ्यासोबत दिवसभर चालली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सकाळी ६ वाजल्यापासून आतापर्यंत, असंही राहुल गांधी म्हणाले. या यात्रेदरम्यान काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना राजीव सातव यांची प्रतिमा भेट दिली.

राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्याविषयीच्या भावना त्यांच्या फेसबुक पोस्टमधूनही मांडल्या. ते म्हणाले,

राजीव सातवजींची आज खूप आठवण येते.

हिंगोली ही त्यांची कर्मभूमी होती. आज जेव्हा त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातवजी या यात्रेत सहभागी झाल्या, तेव्हा भारताला जोडणं हे अनेकांचे स्वप्न आहे हा विश्वास आणखी दृढ झाला. जे आपल्या सोबत चालत आहेत त्यांचाही आणि जे आज आपल्या सोबत नाहीत त्यांचाही.

लोकांचे हक्क त्यांना परत मिळावेत, राहणीमान चांगलं व्हावं, महागाई आणि बेरोजगारी संपुष्टात यावी आणि भारतात प्रगतीची नवी लाट यावी, हे ध्येय आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपण सतत लढत राहू, लढत राहू.

रूपाने माझा राजू घरी येत आहे :

राहुल गांधी हिंगोलीमध्ये राजीव सातव यांच्या घरीही गेले होते. यापूर्वी राजीव सातव यांच्या आई रजनी सातव याही मुलाच्या आठवणीत भावूक झाल्या. राहुल यांच्या रूपाने माझा राजू घरी येत आहे, अशी भावना व्यक्त करत रजनी सातव यांनी अश्रूंचा बांध मोकळा केला.

आज राजीव सातव असते तर राहुल गांधी यांचे आणखी भव्य स्वरूपात स्वागत केले असते. आबाल वृद्धांचा उत्साह पाहण्याजोगा राहिला असता. मात्र, दुर्दैवाने माझ्या राजूला नियतीने हिसकावून नेले. त्यांच्या आठवणी मी विसरू शकत नाही, अशाही भावना रजनी सातव यांनी बोलून दाखवल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in