...तर बाळासाहेबांनी तेव्हाच उद्धव ठाकरेंचा गळा दाबला असता : कृपाशंकर सिंह यांची जीभ घसरली

कृपाशंकर सिंह यांच्या विधानाने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता.
krupashankar singh - uddhav Thackeray
krupashankar singh - uddhav ThackerayMumbai Tak

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू-देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. अशातच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भूट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतात वातावरण तापलं आहे. या दोन्ही वक्तव्याचा निषेध म्हणून आज (शनिवारी) भाजपकडून देशभरात निदर्शन करण्यात येणार आहेत. राज्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शन होत आहेत.

मुंबईतील विलेपार्ले परिसरातही असंच एक निषेध आंदोलन पार पडलं. या आंदोलनात भाजपचे स्थानिक आमदार पराग अळवाणी, महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महाविकास आघाडी आणि नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मात्र कृपाशंकर सिंह यांची जीभ घसरली.

काँग्रेस नेत्यांचा समाचार घेताना कृपाशंकर सिंह म्हणाले, ज्या शिवसेनेसोबत तुम्ही मोर्चा काढत आहात, त्या शिवसेनेने काँग्रेसबद्दल, तुमच्या नेत्या सोनिया गांधींबद्दल काय बोलले ते आठवाव, आठवत नसेल तर 'चुल्लू भर पाणी में डूब मरो'. तर, उद्धव ठाकरेंना लक्ष्य करताना कृपाशंकर सिंह म्हणाले, माझा नालायक मुलगा हिंदुविरोधी शक्तींसोबत जाणार आहे हे जर बाळासाहेबांना त्यावेळी कळलं असतं तर त्यांनी जन्माला आल्या आल्याच उद्धव ठाकरेंचा गळा दाबला असता. सिंह यांच्या विधानानंतर आता नवीन आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

माफी मांगो आंदोलन कशासाठी?

हिंदू-देवदेवता आणि महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात अकलेचे तारे तोडले आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

उद्धवजींच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची वक्तव्यं सध्या समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान केला आहे. त्या विरोधात प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला आहे, असाही आरोप भाजपने केला आहे. याच सर्व गोष्टींच्या निषेधार्ह संपूर्ण राज्यभरात “माफी मांगो” आंदोलन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in