Uddhav Thackeray : 'मधल्या काळात एक क्लिप फिरली... खरं तर असं माझ्या काळात कधी झालं नव्हतं'

शिवसेना आणि ठाकरे वेगळं करून दाखवा हिंमत असेल तर असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं आहे
BJP's ploy is to separate Shiv Sena and Thackeray Says Uddhav Thackeray in  Interview
BJP's ploy is to separate Shiv Sena and Thackeray Says Uddhav Thackeray in Interview

शिवसेनेत २१ जूनला सर्वात मोठा भूकंप झाला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. शिवसेना त्यात सहभागी होती. तरीही एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यामुळे राज्याचं राजकारणच बदलून गेलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. आता संपूर्ण शिवसेनाच एकनाथ शिंदे ताब्यात घेऊ पाहात आहेत. याबाबत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी रोखठोक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. एवढंच नाही तर शिवसेना आणि ठाकरे वेगळं करणं हा भाजपचा डाव आहे असाही आरोप त्यांनी केला.

दुसऱ्याचे आदर्श चोरणं हे भाजपचं काम

बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर मी शिवसेना उभी केली हीच भाजपची पोटदुखी आहे. त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत. गांधी आणि काँग्रेस वेगळी केली अगदी तसंच त्यांना शिवसेनेच्या बाबत करायचं आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. टीकात्मक बोलायचं म्हणून मी बोलत नाही. पण सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे हे आदर्श आहेत. स्वतःकडून कुठले आदर्श निर्माण झाले नाहीत की दुसऱ्यांचे आदर्श फोडायचे. हे आमचेच आदर्श आहेत असं भासवायचं. आता ते शिवसेना आणि ठाकरे वेगळे करू पाहात आहेत. बाळसाहेब ठाकरेंना मानसन्मान दिलाच पाहिजे नाहीतर जोड्याने मारतील हे भाजपला माहित आहे.

भाजपला बाळासाहेब हवेत पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे

भाजपला बाळासाहेब हवेत पण ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे. ज्यांना हे करायचं आहे त्यांना मी आव्हान देतो की असं करून दाखवा. उलट हे देखील सांगेन की माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नये. ती मागावी लागत आहेत याचाच अर्थ हा आहे की तुम्ही कर्तृत्ववान नाही. तुम्ही मर्द नाहीत. तुम्हाला हा आधार घ्यावा लागतो आहे हे मान्य करा. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं का म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातो आहे हे मला चांगलंच माहित आहे. काही लोक फुटून बाहेर पडले आहेत. त्यांच्याकडून शिवसेना ताब्यात घेण्यासाठी, हायजॅक करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. शिवसेना हायजॅक करणं सोपं नाही. मी माझ्या माहितीतल्या कायदेतज्ज्ञांशी बोलून अत्यंत जबाबदारीने वक्तव्य करतो आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आधी दोन तृतीयांश संख्या एखाद्या पक्षातून वेगळी झाली की त्यांना वेगळा गट स्थापन करता येत होता. आता तो कायदा गेला. जे बाहेर पडले आहेत ते दोन तृतीयांश असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील त्यांना वेगळा गट स्थापन करता येत नाही. हे कायदेतज्ज्ञांनी तसंच घटना तज्ज्ञांनी मला सांगितलं आहे त्या आधारे मी सांगतो आहे. याचाच अर्थ या गटाला कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल. मग त्यांच्यासमोर पर्याय आहे तो भाजपचा किंवा मग सपा, एमआयएम असे काही पर्याय आहेत. बच्चू कडू यांचाही एक छोटा पक्ष आहे त्यात या गटाला सहभागी व्हावं लागेल.

जर बाहेर पडलेला गट पक्षात विलीन झाला तर भाजपला त्यांचा जो काही वापर करून घ्यायचा आहे तो संपेल. कारण त्यांची ओळखच पुसली जाईल. त्यामुळे एकच भ्रम पसरवत आहेत की आम्ही म्हणजेच शिवसेना. मधल्या काळात एक क्लिप फिरली बघा.. खरं तर असं माझ्या काळात कधी झालं नव्हतं. माझ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बसायचे, पण त्यांनी कधी माझा माईक खेचला नव्हता. काही वेळेला त्यांच्याकडे अर्थसंकल्प वगैरे संदर्भात अधिक माहिती असायची तेव्हा मी त्यांना सांगायचो की, दादा तुम्ही उत्तर द्या. माझ्याकडून कोणी माईक नाही खेचला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

आमच्या महाविकास आघाडीत एक सभ्यता होती, समन्वय होता. पण त्यात जे उपमुख्यमंत्री बोलले की हे म्हणजेच शिवसेना. त्यातच हे दिसून आलं की त्यांचा डाव हा आहे की उपयोग आहे तोपर्यंत फुटलेल्यांना शिवसेना म्हणायचं त्यांचा उपयोग संपला की पालापाचोळा गोळा करून टोपलीत भरून फेकून द्यायचा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in