ठाकरे गट नागपुरात अन् शिंदे गटाने मुंबईतील कार्यालय बळकावलं... कार्यकर्ते भिडले

विधानसभेतील कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता शिंदे गटाने महापालिकेतीलही कार्यालयावर ताबा मिळवला
BMC - Shivsena
BMC - ShivsenaMumbai Tak

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह जवळपास सर्वंच प्रमुख नेते नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये व्यस्त आहेत. त्याचवेळी बुधवारी (दि.२८) मुंबईमधील महापालिकेतील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतले आहे. शिंदे गटाने अचानक केलेल्या या कृतीमुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली.

यावेळी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव आणि इतर नेते उपस्थित होते. विधानसभेतील कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता शिंदे गटाने महापालिकेतीलही कार्यालयावर ताबा मिळविल्याने वातावरण तणावपूर्ण झालं होतं. त्यामुळे अखेर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

राहुल शेवाळे काय म्हणाले?

आजच्या घडामोडींवर बोलताना राहुल शेवाळे म्हणाले, "शिवसेनेचे कार्यालय हे बाळासाहेबांच्या शिवसेनचे कार्यालय आहे. मुंबईच्या महानगरपालिकेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा हक्क आहे. कित्येक वर्षे आम्ही या कार्यालयातून काम केले आहे. त्यामुळे आमच्यासाठी याच महत्व खूप आहे. आम्ही इतर लोकांना भीक घालत नाही, ज्यांना आरोप करायचा आहे त्यांनी करत रहावं. आम्ही मुंबईचा विकास करुन दाखवू"

शिंदे गटाच्या कृतीवर खासदार अरविंद सावंत संतप्त :

शिंदे गटाच्या या कृतीवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, सगळंच घटनाबाह्य सुरु आहे. आधी घटनाबाह्य सरकार आणि त्यानंतर बेकायदेशीर वागणं. महाराष्ट्राच्या जनतेनं या सगळ्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. यांना सगळ्याचं गोष्टी बेकायदा पाहिजेत, त्यामुळे यावर सरकार काही कारवाई करेल असं वाटत नाही.

कुठेही घुसायचं काहीही करायचं. यापूर्वी निवडणूक लढवायची म्हणून हे खोटं बोलले आणि त्यांनी आमचं नाव आणि चिन्ह गोठवून घेतलं. त्यामुळे आत्ताही त्यांनी घुसखोरीच केली आहे. सुप्रिम कोर्टात केस सुरु असताना ही कोण माणस आहेत जी दादागिरी करतात? पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याची ताबडतोब दखल घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in