देसाई-पाटलांचा इरादा पक्का; कर्नाटकच्या पत्राला केराची टोपली : सीमाभागात वातावरण तापलं

"...तर महाराष्ट्राच्या दोन्ही मंत्र्यांवर कारवाई करणार" : कर्नाटक पोलिसांचा इशारा
Chandrakant Patil - Shambhuraje desai
Chandrakant Patil - Shambhuraje desaiMumbai Tak

मुंबई : कर्नाटक सरकारनं १०० पत्र लिहिली तरी आमच्यावर त्याचा कसलाही परिणाम होणार नाही. मराठी भाषिक लोकांसाठी, त्यांचं म्हणणं ऐकूण घेण्यासाठी येत्या ६ डिसेंबरला मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील बेळगांव दौऱ्यावर जाणारचं, असा इरादा सीमा समन्वय मंत्री शंभुराज देसाई यांनी बोलून दाखविला. ते आज माध्यमांशी बोलत होते.

काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकांनंतर दोन्ही राज्यांच्या प्रमुख नेत्यांकडून विधान करण्यात आली. बेळगाव, कारवार, निपाणीसह तब्बल ८०० गावांचा सीमाप्रश्न अद्यापही प्रलंबित असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट जत आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितला.

या दाव्याला महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमंत्रणावरुन सीमा समन्वय मंत्र्यांचा बेळगाव दौरा निश्चित झाला आहे. या मंत्र्यांच्या दौऱ्याला काही कन्नड संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे सीमाभागातील वातावरण तणावग्रस्त बनलं आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दोन्ही मंत्र्याचा दौरा रद्द करण्याची विनंती करणारे पत्र पाठविण्यात आले आहे.

शंभूराज देसाई काय म्हणाले?

याबाबत शंभूराज देसाई बोलताना म्हणाले, कर्नाटक सरकारनं १०० पत्र लिहिली तरी आमच्यावर त्याचा कसलाही परिणाम होणार नाही. मराठी भाषिकांसाठी, मराठी भाषिकांचं म्हणणं ऐकूण घेण्यासाठी ६ डिसेंबरला मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील बेळगांवला जाणारचं आहोत. आम्ही ३ डिसेंबरलाच जाणार होतो. मात्र ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी ६ डिसेंबरला जाणार आहे. लोकशाही मार्गाने चालणार हा देश आहे. कोणीही कुठेही जावू शकतं, येऊ शकतं. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी याठिकाणी येवू नये असं कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी किंवा मंत्र्यांनी म्हणणं योग्य नाही असंही ते म्हणाले.

कर्नाटक पोलिसांचा मंत्र्यांना इशारा :

महाराष्ट्रातील मंत्री बेळगांवमध्येच पोहचण्यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी दोन्ही मंत्र्यांना आणि मराठी संघटनांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मंत्री विवाहासाठी, कोणाच्या घरी भोजनासाठी किंवा चर्चेसाठी बेळगावमध्ये येत असतील तर आम्ही काही करू शकत नाही; पण त्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला किंवा त्यांनी तसा प्रयत्न जरी केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिला आहे.

असा असणार दौरा :

या दौऱ्यात मंत्री पाटील आणि मंत्री देसाई महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. तसंच हुतात्मा स्मारक येथे जाऊन सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. शिवाय या हुतात्म्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in