‘बाबरी पाडण्याशी बाळासाहेबांचा संबंध नाही’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
‘बाबरी पाडण्याशी बाळासाहेबांचा, शिवसेनेचा संबंध नाही’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेला म्हणजेच एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना सवाल केला आहे.
ADVERTISEMENT

बाबरी मशीद प्रकरणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याला निमित्त ठरलं आहे भाजपचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी काहीही संबंध नव्हता, असं ते म्हणाले. पण, यावरून कोंडी झाली आहे ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची. कारण ठाकरे गटाने शिंदेंच्या शिवसेनाला घेरलं असून, संजय राऊतांनी थेट सवाल केला आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक विधान केलं. ज्यावरून आता ठाकरे गटाने शिंदे गटाला घेरलं आहे. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले. ते आधी बघूयात…
बाबरी पाडण्याशी बाळासाहेबांचा, शिवसेनेचा संबंध नाही; चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील या मुलाखतीत असं म्हणाले की, “ढाचा पडल्यानंतर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय, बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते का, शिवसेना तिथे गेली होती? का, बजरंग दल तिथे होता. कारसेवक कोण होते? कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की आम्ही बजरंग दलाचे नाव घेणार नाही. ना आम्ही शिवसेनेचे आहे. वेगळे आहोत, असं म्हणणारे कुणी नव्हतं.”
हेही वाचा >> दंगलीनंतरचा तो काळ, शिवसेनेची हमी आणि झहीर मुंबईतच राहिला!
“सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की, हेच करतील आणि केलं ते. बाबरी ज्यांनी पाडली ते कदापि शिवसैनिक नव्हते. मी गेलो. महिनाभर मला नेऊन ठेवलं होतं. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, विधान परिषदेत असणारे हरेंद्र कुमार आणि मी, असे तीन राष्ट्रीय सरचिटणीस होतो विद्यार्थी परिषदेचे. आम्हा तिघांना तिथे ठेवलं होतं.”










