
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटकच्या चिघळलेल्या सीमावादाच्या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लक्ष घालणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावच्या परिस्थितीवर अमित शाह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसंच या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. स्वतः शिंदे-फडणवीस यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आंदोलनाने मंगळवारी हिंसक वळण घेतलं. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या काही गाड्यांवर दगडफेक केली, तसंच गाड्यांना काळं देखील फासलं. त्यामुळे सीमेवरील परिस्थिती तणावग्रस्त बनली. या चिघळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून हे सर्व प्रकरण अमित शाह यांच्याही कानावर घालणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं.
बुधवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली. एसटीची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत दोन्ही राज्यातील जनतेला त्रास होवू नये, अशी आमची चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशीही याबाबतबत माझी चर्चा झाली, असंही ते म्हणाले.
या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. सगळी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्ला होणं हे योग्य नाही. मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोललो असल्याचं त्यांना सांगितलं. पण तरीही मी गृहमंत्री शाह यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. तसंच दोन्ही राज्यातील गाड्यांवर हल्ला करणं बंद होण्याची गरज आहे, याबाबत तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगाव, अशीही विनंती त्यांना केली. गृहमंत्री नक्की त्यात लक्ष घालतील, असं फडणवीस म्हणाले.