Uddhav Thackeray: 'एकनाथ शिंदेंचं अभिनंदन, पण ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत'

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Congratulations to Eknath Shinde on becoming the CM of Maharashtra, but he is not from Shiv Sena Says Uddhav Thackeray
Congratulations to Eknath Shinde on becoming the CM of Maharashtra, but he is not from Shiv Sena Says Uddhav Thackeray

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं महत्त्वाचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच अभिनंदन करत असतानाच उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी?

''आत्ता जे काही सरकार अस्तित्वात आलंय चांगलं आहे. महाराष्ट्रासाठी चांगलं काम करण्यासाठी त्या सरकारला शुभेच्छा. ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार स्थापन केलं त्यांच्या मते तथाकथित शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केलं. हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझं आणि अमित शाह यांचं हे ठरलं होतं की अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यावा. तसं जर का झालं असतं तर सगळं सन्मानाने झालं असतं. पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, नंतर भाजपचा झाला असता.

''त्यावेळी नकार देऊन आता हे भाजपने का केलं? हा प्रश्न माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. शिवसेना अधिकृत तुमच्यासोबत होती. आधी जे ठरलं होतं ते हेच ठरलं होतं. ठरलेलं घडलं असतं तर महाविकास आघाडीचं सरकार आलंच नसतं. आत्ता जे शिवसेनेविरोधात बंड करून गेलेत त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा की अडीच वर्षापूर्वी काय ठरलं होतं. आत्ता भाजपने हा संभ्रम निर्माण केला आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री. पण ते तसं नाही, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.'' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मातोश्रीत माझ्यासोबत जे अमित शाह यांनी ठरवलं होतं ते मान्य केलं असतं तर शानदारपणे हे सरकार अस्तित्त्वात आलं असतं. अडीच वर्षे झाली आहेत. मी तेव्हाही सांगितलं होत आमच्यात जर झालेला करार मान्य झाला असता तर शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी पायऊतार होईल याचं पत्र मुंबईतल्या मंत्रालयात लावलं असतं असं उद्धव ठाकरेनी सांगितलं.

एवढंच नाही तर मला दिलेला शब्द त्यांनी पाळला असता तर किमान अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. आता हे सगळं करून अमित शाह तसंच भाजप यांना काय साध्य करायचं आहे माहित नाही. जनतेला यातून काय मिळेल हेपण कळू शकेल. असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. विचित्र पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला खुर्चीवरून उठवून जे साध्य केलं आहे, ते काही योग्य नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in