
मद्य उत्पादन धोरण घोटाळ्यात अडकलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपकडून पक्ष तोडण्याची ऑफर आल्याचा मोठा दावा केला आहे. पक्ष फोडल्यास त्यांच्यावरील खटले परत घेण्यात येतील, असे सांगण्यात आले.असा दावा मनीष सिसोदिया यांनी केला आहे.
भाजपच्या एका नेत्याची रेकॉर्डिंग त्यांच्याकडे उपलब्ध असून गरज पडल्यास ते प्रसिद्धही केले जाऊ शकते, असे आपचे म्हणणे आहे. मनिष सिसोदिया यांनीही एका ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे की, कोणत्याही पदाच्या लालसेपोटी आपण पक्षाशी गद्दारी करणार नाही. अरविंद केजरीवाल माझे राजकीय गुरू आहेत, मी त्यांचा कधीही विश्वासघात करणार नाही, असं सिसोदिया म्हणाले.
मी मुख्यमंत्री बनण्यासाठी नाही आलो. माझं स्वप्न आहे की, देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, तरच भारत देश एक नंबरवर येईल . संपूर्ण देशात हे काम फक्त केजरीवालच करू शकतात, असा विश्वास मनिष सिसोदिया यांनी व्यक्त केलाय.
सोमवारी मनिष सिसोदिया यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की "मला भाजपचा संदेश मिळाला आहे, "आप" तोडा आणि भाजपमध्ये या, सीबीआय ईडीचे सर्व खटले बंद होतील. यावर भाजपला माझे उत्तर आहे की, मी महाराणा प्रतापांचा वंशज आहे. मी राजपूत आहे. स्वतःच शीर कलम करेन पण मी भ्रष्ट-षडयंत्रकर्त्यांपुढे झुकणार नाही.माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत, तुम्हाला जे करायचे ते करा, असं आव्हान त्यांनी भाजपला दिलंय.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर मद्य उत्पादन धोरणात घोटाळा केल्याचा आरोप आहे. नुकतंच सीबीआयने त्यांच्या घरासह कार्यालयावर धाडी टाकल्या. यासह अन्य चौदा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याविरोधात लूक आउट नोटीस देखील जरी करण्यात आली होती. सीबीआयने एफआयआरची प्रत आणि मद्य घोटाळ्याशी संबंधित इतर कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे सुपूर्द केली आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
सिसोदिया यांच्याविरोधात लावण्यात आलेल्या आरोपाचं त्यांनी खंडन केलंय. सीबीआय केंद्रात सत्तेत बसलेल्यांच्या आदेशावरून कारवाई करत असल्याचं दावा सिसोदियांनी केलं आहे. तर लूक आउट सर्क्युलर नोटिसीवरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता त्यांनी भाजपकडून आप पार्टी फोडून भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर आल्याचं सांगितलं आहे.