रोहित पवारांच्या 'त्या' आरोपाला देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर, म्हणाले..

भाजपचं पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी फोडणं असू शकतं असा आरोप रोहित पवार यांनी केला होता त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे
Deputy Cm Devendra Fadanvis Reacted After Ncp Leader Rohit Pawar Alleged Opponents Would Target Us After Shivsena
Deputy Cm Devendra Fadanvis Reacted After Ncp Leader Rohit Pawar Alleged Opponents Would Target Us After Shivsena

शिवसेना फोडल्यानंतर आता पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केला होता. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गंभीर आरोप भाजपवर केला होता. त्याबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर होते तिथे माध्यमांनी जेव्हा त्यांना रोहित पवारांच्या आरोपाविषयी विचारलं तेव्हा त्यांनी या आरोपाला उत्तर दिलं.

रोहित पवार यांनी नेमका काय आरोप केला होता?

शिवसेनेत ज्या प्रमाणे फूट पडली ती फूट आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. आता पुढचं लक्ष्य आम्ही असू शकतो. पवार कुटुंबात फूट पाडली की राष्ट्रवादी फोडता येईल असं भाजपला वाटतं. त्यामुळे ते पुढे आमच्यात फूट पाडण्याची परिस्थिती निर्माण करतील किंवा फूट पाडतील या आशयाचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत, अजित पवार यांना राज्यात आणि मला सध्या जे काम करतो आहे तेच करण्याची इच्छा आहे. पण भाजपने ज्याप्रमाणे शिवसेनेत दोन गट पाडले त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडायचा आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र शरद पवार यांनी काही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपाला काय उत्तर दिलं आहे?

देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जेव्हा याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की काही लोक स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी असे आरोप करत असतात. असं म्हणत त्यांनी नाव न घेता रोहित पवारांच्या आरोपाला उत्तर दिलं आहे.

२१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठा भूकंप

२१ जून २०२२ ला शिवसेनेत सर्वात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारत ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत का गेले? असा प्रश्न उपस्थित करत हे बंड पुकारलं. एवढंच नाही तर त्यांना शिवसेनेतल्या ४० आमदारांची साथ लाभली. या सगळ्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. या सगळ्या घडामोडी आणि सद्यस्थितीबाबत रोहित पवार यांची एक मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in