औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं...

महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर तसंच उस्मानाबादचं धाराशिव हे करण्याचा निर्णय घाईने घेतला होता असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं
Deputy CM Devendra Fadnavis Said Eknath Shinde Government will Rename Aurngabad and Osmanabad City
Deputy CM Devendra Fadnavis Said Eknath Shinde Government will Rename Aurngabad and Osmanabad City

औरंगाबादचं संभाजीनगर हे नामकरण तसंच उस्मानाबादचं धाराशिव हे नामकरण आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाणारच आहे, यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबतची घोषणा केली आहे. आम्ही आधीच्या सरकारने घेतलेला म्हणजेच ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय रद्द केला आहे. कारण त्यांना बहुमत सिद्ध करा हे राज्यपालांनी सांगितलेलं असताना आणि त्यांचं सरकार अल्पमतात आहे हे माहित असताना त्यांनी कॅबिनेट बोलवली आणि घाई घाईत हा निर्णय घेतला. तो निर्णय वैध नव्हता, आमच्याकडे बहुमत आहे आमचं सरकार हा निर्णय घेईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती दिली ही बातमी येताच विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा नातेवाईक लागतो का? हा प्रश्नही टीका करताना विचारून टाकला. या सगळ्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण दिलं आहे आणि बहुमत असलेलं आमचं सरकार हा निर्णय घेईल हे देखील सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणखी काय म्हणाले?

जेव्हा राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र दिलेलं असतं तेव्हा कुठलाही महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यायचा नसतो हा नियम आहे. तसंच ही परंपराही महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून आहे. पूर्वी अनेकदा राज्यपाल बहुमत सिद्ध करा हे सांगत असायचे त्यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जायचे. ही बाब लक्षात घेऊन बहुमत सिद्ध करा हे पत्र दिलेलं असताना महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नसतात हे कोर्टाने वारंवार सांगितलं आहे. तरीही औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला. मागच्या अडीच वर्षात या मागण्यांना ज्या सरकारने या प्रश्नांना हातही लावला नाही त्यांनी बहुमत गमावल्यावर तातडीने कॅबिनेट बैठक बोलवून हे निर्णय घेतले हे संकेतांना धरून नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत नव्हतं. आमचं तसं नाही.

हे तीन निर्णय आम्हीही घेणारच. आम्हालाही हीच नावं द्यायची आहेत आमचा वेगळा कुठलाही अजेंडा असण्याचं कारण नाही. आमच्या सरकारचं बहुमत असलेलं मंत्रिमंडळ या निर्णयांना मान्यता देईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सांगितलं आहे की ही नावं देणं आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे हीच नावं दिली जाणार आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in