दोघांनी मेळावे घेतले तरी चालतील, पण...; अजित पवारांनी शिंदे-ठाकरेंना सांगितला सुवर्णमध्य

दसरा मेळावा, ग्रामपंचायत निकाल, रामदास कदम, संजय राऊत, चित्ता, या सर्व विषयांवर अजित पवार बोलले आहेत.
दोघांनी मेळावे घेतले तरी चालतील, पण...; अजित पवारांनी शिंदे-ठाकरेंना सांगितला सुवर्णमध्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्यावरुन भाष्य केलं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल, रामदास कदम, संजय राऊत, चित्ता, रिफायनरी प्रकल्प अशा सर्वच घडामोडींवरती अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार दसरा मेळाव्यावरुन काय म्हणाले?

''दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रयत्न करावा. हायकोर्टमध्ये जाऊन पण परवानग्या घेतल्या गेल्या आहेत. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरतीच सभा घेत आहेत. बाळासाहेबांनीच उद्धव ठाकरे यांना सांभाळा असं आवाहन केलं होतं. शिंदे गटाला बीकेसीची जागा उपलब्ध करून दिली आहे, तर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मिळावं, दोघांनी मेळावे घेतले तरी चालतील'', असं अजित पवार म्हणाले आहेत.

ग्रामपंचायत निकालावरुन बोध घ्यावा- अजित पवार

राज्यात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. त्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. त्यावर अजित पवार म्हणाले ''ग्रामपंचायतच्या निवडणूक या पक्ष चिन्हावर होत नाहीत. जे आकडे आले त्यात महाविकास आघाडी सरकारला जास्त जागा आल्या आहेत, यातून सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. माझ्या बारामतीमध्ये दोन्ही पॅनल राष्ट्रवादीला मानणारे आहेत, ही निवडणूकीची रंगीत तालीम असल्याचं'' अजित पवार म्हणाले आहेत. जे निवडूण आले आहेत त्यांनी गावाचा विकास करावा असा सल्लाही अजित पवारांनी दिला आहे.

रामदास कदमांच्या वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार?

एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोलीच्या सभेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दाढी आणि लग्नावरती त्यांनी भाष्य केले होते. त्यावर अजित पवार म्हणाले ''कोणी दाढी वाढवावी, कधी लग्न करावे हा वैयक्तिक विषय आहे. राजकारणात वैयक्तिक राग ठेवत निंदा नालस्ती करणे योग्य नाही. तुमचे विचार भूमिका मांडा. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.'' असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार संजय राऊत यांच्या चार्जशीटवरती काय म्हणाले?

शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीनं चार्टशीट दाखल केली आहे. त्यात त्यांनी पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांचा हात असल्याचं म्हटलं आहे. त्यावरी अजित पवार म्हणाले ''ईडीची या प्रकरणात चौकशी सुरू आहे, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आत कोर्टात ज्यानं त्यानी आपली भूमिका मांडावी. कोर्ट निर्णय घेईल. यात काय आरोप होतायत यावर बोलणं योग्य नाही.'' देशात चित्ते वाढणे ठिक आहे पण त्यातून रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in