“…आ रहे हैं एकनाथ”, शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी ‘रामराज्य’ टिझर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी शिवसेनेकडून टिझर रिलीज करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्याभोवती फेर धरू लागलं आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांना भाजप-शिवसेनेकडून हिंदुत्वावरून सातत्याने कात्रीत पकडण्याचा प्रयत्न होत असून, आता शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी शिवसेनेकडून एक टिझर रिलीज करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना नेत्यांसह एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याआधी शिवसेनेकडून एक टिझर रिलीज करण्यात आला असून, त्यात रामराज्याचा नारा देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे अयोध्या दौरा : कण कण में राम… टिझरमध्ये काय?
टिझरच्या सुरुवातीलाच रामराज्य असं म्हटलं आहे. पुढे रामराज्य… एक राज्य ज्या सुशासन असेल. नंतर महाराष्ट्राचा भगव्या रंगातील नकाशा दाखवण्यात आला असून, एक सुशासित राज्य असं म्हटलेलं आहे.
रामराज्य जिथे शासक नसेल, तर सेवक असावा. त्यानंतर एकनाथ शिंदेंचे पाहणी करतानाचे दृश्य असून, पुढे रामराज्य जिथे जनता हेच कुटुंब असावं. रामराज्य जिथे माणसाची सेवा सर्वोच्च असावी. रामराज्य जिथे अन्यायाच्या विरोधात आवाज उठावा. रामराज्य जिथे भगवा कधीही गायब होणार नाही.
हेही वाचा- उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एंट्री देणार? अमित शाहांनी विषय केला क्लिअर
पुढे टिझरमध्ये म्हटलं आहे की, जिथे नसा नसांत राम असावा, कण कणात राम असावा. अयोध्या में शंखनाद, आ रहे हैं एकनाथ,” असं म्हणत या टिझरचा शेवट करण्यात आला आहे. या टिझरमध्ये एकनाथ शिंदे यांची भेटीची, पाहणी दृश्य घेण्यात आली असून, प्रकाश आमटे यांच्यासोबतचे दृश्यही आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा असा असेल…
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरात तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. लखनौपासून अयोध्येपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मोठंमोठे बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात येणार आहे.
अयोध्या में शंखनाद आ रहे हैं एकनाथ.. मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याचा टिझर रिलीज#EknathShinde #Ayodhya pic.twitter.com/RxBrbwxqdM
— Mumbai Tak (@mumbaitak) April 7, 2023
9 एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत पोहोचणार आहे. त्यानंतर रामलल्लाचे दर्शन घेणार. त्याचबरोबर हनुमान गढी पूजा आणि दर्शन, राम मंदिराच्या बांधकामाची पाहणीही मुख्यमंत्री शिंदे करणार आहेत. शरयू तिरावर आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरातील महाराजांचे आशीवार्दही शिंदे घेणार आहेत.
हेही वाचा- CM शिंदेंविरुद्ध थोपटले दंड! आदित्य ठाकरे कोणत्या मतदारसंघातून देऊ शकतात आव्हान, हे आहेत पर्याय
एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल होण्यापूर्वी 8 एप्रिलपासून शिवसैनिक अयोध्येत जाणार आहेत. शरयू नदीकाठी आरती पूर्ण करून मुख्यमंत्री शिंदे परत मुंबईला परतणार असल्याची माहिती आहे.