ठाकरेंना सोबत हवा असलेला वंचित ‘फॅक्टर’ काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी खरंच महत्त्वाचा?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Vanchit Bahujan Aghadi: शिवशक्ती-भीमशक्ती युतीसाठी ठाकरे-आंबेडकरांमध्ये बोलणी सुरू झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू एकत्र आल्यानं महाराष्ट्रात नवं सत्तासमीकरण उदयाला येईल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याच सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आपण वंचितचा (Vanchit Bahujan Aghadi) फॅक्टर काय? त्याचं राजकीय मूल्य काय आणि तो ठाकरेच नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही (Congress-NCP) किती मॅटर करतो हेच आपण जाणून घेणार आहोत. (how much does the vanchit bahujan aghadi factor matter for congress ncp a complete statistics)

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांमध्ये शिवशक्ती-भीमशक्तीसाठीची औपचारिक बोलणी सुरू झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी दोघांमध्ये बैठक पार पडली. आणि यानंतरच अचानक बोलावण्यात आलेली महाविकास आघाडीचीही बैठक झाली. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू सामील करून घेण्यासाठी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. पण आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनं बोलणी, प्रयत्न करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळीही आंबेडकरांशी बोलणी झाली होती. या बोलणीला काही फळ आलं नाही आणि दोन्ही निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या फॅक्टरनं काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. हाच वंचित फॅक्टर आपण लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून समजून घेणार आहोत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘शिवशक्ती-भीमशक्ती’ला आंबेडकरांचा होकार; ठाकरेंची भूमिका काय? ‘वंचित’कडून विचारणा

भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी 2019 साठी नवा प्रयोग केला. वंचित बहुजन आघाडीच्या नावानं दलित, मुस्लिमांसोबतच सत्तेत पुरेसं स्थान न मिळालेल्या जात, वर्गसमूहांना सोबत घेतलं. लोकसभेला एमआयएमसोबत आघाडी केली. या आघाडीनं इम्तियाज जलिल यांच्या रूपानं औरंगाबादची जागा जिंकली. आणि 48 पैकी तब्बल 13 जागांवर लाखाच्या घरात मतं मिळवली.

ADVERTISEMENT

यापैकी काही ठिकाणच्या कामगिरीनं तर भल्याभल्यांची झोप उडवून दिली. औरंगाबाद आणि सांगलीत तीन लाख, तर अकोल्यात दोन लाखांहून जास्त मतं मिळवली. सोशल इंजिनिअरिंगच्या जोरावर वंचितच्या उमेदवारांना पहिल्याच फटक्यात 41 लाख 32 हजार मतं मिळाली. बीड, उस्मानाबाद, रावेर, यवतमाळ-वाशिम या चार मतदारसंघात नव्वद हजाराच्या घरात मतं मिळवली.

ADVERTISEMENT

मराठवाड्यातल्या आठही मतदारसंघात सरासरी सव्वा लाख मतं वंचितच्या उमेदवारांना मिळाली. जालन्यात सर्वांत कमी 77 हजार मतं मिळाली. या आठ मतदारसंघातल्या मतांची गोळाबेरीजच बाराऐक लाखाच्या घरात जाते. पण मुंबई, ठाणे या कोकणपट्ट्यात मात्र वंचितला साडेचार लाखांच्या घरातच मतं मिळाली. या मतांमुळेच आता वंचितवर वोटकटुआ असल्याची टीका सुरू झाली आहे.

दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे जेवढ्या मतांनी हरले त्यापेक्षा जास्त मतं वंचितच्या उमेदवाराला पडली.

सांगली, सोलापूर, हातकणंगले, परभणी, नांदेड, बुलडाणा आणि गडचिरोली या सात मतदारसंघात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मतं एकत्रित केल्यास ती युतीच्या उमेदवारापेक्षा जास्त होतात. दलित आणि मुस्लिम मतं निर्णायक असलेल्या परभणी आणि नांदेडमधे तर 40 हजार मतांच्या फरकाने काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. दोन्ही ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवाराला दीडेक लाखाच्या घरात मतं मिळाली.

Shiv Sena : ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार? अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य

अशा प्रकारे वंचित आणि काँग्रेस आघाडीच्या मतांची बेरीज केल्यास काँग्रेसचे तीन, तर राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचे प्रत्येकी दोन उमेदवार भाजप युतीहून वरचढ ठरतात.

आता आपण विधानसभा निवडणुकीत काय झालं ते जाणून घेऊया. वंचित फॅक्टरची कमाल बघितलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीनं विधानसभेसाठी आंबेडकरांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. पण बोलणी शेवटपर्यंत झालीच नाही. दुसरीकडे लोकसभेचा पार्टनर एमआयएमची साथही आंबेडकरांनी सोडली. आंबेडकरांनी स्वबळ आजमावलं पण या निवडणुकीत त्यांचे सर्व उमेदवार पडले. उमेदवार पडले तरी वंचितला अनेक मतदारसंघात जय-पराजयाचं गणित ठरवणारी निर्णायक मतं पडली. त्यामुळेच निकालानंतर वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप सुरू झाला.

तत्कालीन सत्ताधारी भाजपला सर्वाधिक 105, तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. त्याखालोखाल राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. जवळपास 32 जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी 5 ते 10 हजार मतांच्या फरकाने पडले. आणि याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा आकडा दहा हजारांहून अधिक होता. वंचितमुळे आपल्या जनाधारामध्ये फाटाफूट झाल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आजही केला जातो.

दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत वंचित आघाडी असती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकलेल्या 98 जागा आणि पडलेल्या 32 जागा मिळवून १३० ची गोळाबेरीज झाली असती. म्हणजे बहुमतासाठी केवळ १५ जागा कमी पडल्या असत्या.

ही सारी जर-तरची गोष्ट झाली. पण हेच जरतरचं गणित आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणातली प्रकाश आंबेडकरांची किंमत काय हे सांगतं. आणि याच गोळाबेरजेमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट झाल्यानं ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. यातूनच मार्ग काढण्यासाठी ठाकरे शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग नव्यानं करू पाहत आहेत.

या प्रयोगाल किती यश येईल हे निवडणुका जशा जवळ येतील, तसं कळेल. पण आंबेडकरांनी ठाकरेंसोबत जावं, मविआमध्ये सामील व्हावं की वेगळं लढावं? याबाबत राज्यातील जनतेला काय वाटतं हे आगामी निवडणुकांमधून स्पष्ट होईलच.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT