Poonam Mahajan : माझ्या वडिलांना कोणी मारलं मला माहित, पण हत्येचा मास्टरमाईंड कोण आहे?

भाजप खासदार पूनम महाजन यांनी १६ वर्षांनी उपस्थित केला प्रश्न
I know who killed my father, but who is the mastermind of the murder? Asks Poonam Mahajan
I know who killed my father, but who is the mastermind of the murder? Asks Poonam Mahajan

भाजपच्या नेत्या आणि खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे. यावेळी टीका करत असताना त्यांनी आपल्या वडिलांच्या हत्येचा म्हणजेच प्रमोद महाजन यांच्या हत्येचा उल्लेख केला आहे. माझ्या वडिलांना कुणी मारलं ते मला माहित आहे मात्र तुम्ही मास्टरमाईंड का शोधला नाही असा प्रश्न पूनम महाजन यांनी विचारला आहे. प्रमोद महाजन यांची हत्या झाली त्यावेळी सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं होतं त्यांनी मास्टरमाईंड शोधला नाही असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपचे नेते प्रमोद महाजन यांची हत्या त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी केली होती. प्रमोद महाजन यांच्या राहत्या घरी जाऊन प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी ही बातमी ठरली होती. प्रमोद महाजन यांच्या हत्येला इतकी वर्षे झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची कन्या आणि भाजप खासदार पूनम महाजन यांनी हा हत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे. एवढंच नाही तर राजकारणातले शकुनीमामा कोण? हे जनतेला माहित आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर काय घडलं?

प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर प्रवीण महाजन यांना अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगवासही झाला. मात्र जेव्हा ते पॅरोलवर बाहेर आले होते तेव्हा ते आजारी झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करावं लागलं. रूग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे कारण पूनम महाजन यांनी या प्रकरणातल्या मास्टरमाईंडचा उल्लेख केला आहे.

पूनम महाजन यांनी शरद पवारांना म्हटलं होतं शकुनीमामा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून टीका केली होती. तेव्हा अजित पवार यांनी पूनम महाजन यांच्यावर टीका करत तुझ्या चुलत्याने तुझ्या बापाला का मारले, दोघेही एकाच आईचे मुलगे होते, तरी एका भावाने दुसर्‍या भावाला का मारले असा सवाल केला होता. आता मुंबई महानगरपलिकेच्या निवडणुकीपूर्वी हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

पूनम महाजन यांनी या प्रकरणात मास्टरमाईंड होता त्याला का शोधलं नाही असा सवाल आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केला आहे.

मुंबईत भाजपची मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जय्यत तयारी

भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. रविवारी मुंबईतल्या वांद्रे येथे भाजपची प्रचारसभा पार पडली. तेव्हा खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. २००५ मध्ये काँग्रेस -राष्ट्रवादीचे सरकार असताना माझ्या वडिलांची हत्या झाली परंतु सत्ताधारी पक्षाने त्यामागील मास्टरमाईंड कोण होते याचा शोध घेतला नाही. युतीत महाभारत घडलं, परंतु या महाभारतात शकुनी कोण होते हे सगळ्यांनाच माहित आहे. युतीमध्ये महाभारत घडवून शकुनींनी आपले महाभारत रचले अशी टीकाही महाजन यांनी शरद पवारांवर केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in