
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता मंत्रिमंडळ विस्तारावरून पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारला खरमरीत प्रश्न विचारला आहे. तुमच्याकडे बहुमत आहे तर मग मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन एक महिना होईल तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
या सरकारकडे बहुमत आहे तर मग मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे ना? मात्र हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर कामं कधी होणार? या सरकारला एवढं मोठं बहुमत मिळाल आहे, त्यांनी ते विधानसभेत दाखविलंही आहे. तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला इतका वेळ का लागतो आहे?
मी काही मुद्द्यांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो. तेव्हाही त्यांना विचारलं की राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही. ते म्हणाले आम्ही करतो... मात्र ते विस्तार करतो असे म्हणत असले तरी ते होत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे... कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी, की इतर काही समस्या आहे, हे माहीत नाही असं म्हणत अजित पवारांनी या सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने अधिवेशन लांबलंय. लवकर अधिवेशन बोलवा अशी आमची मागणी होती. मात्र, ते अधिवेशनही बोलावले जात नाही आहे.. त्यामुळे जशी मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, तशी मदत मिळताना दिसत नाही असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
सत्ता बदल होताना मोठ्या प्रमाणावर आश्वासनं देण्यात आली त्याची पुर्तता कठीण होत आहे म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही का??? असं ऐकलं आहे... भाजपकडे ११५ आमदार आहेत. भाजप कार्यकारणी मधील रोख लक्षात घेतला तर आमदारांनी त्यागाची भावना ठेवा असे सांगण्यात आलं. मात्र तिकडे शिंदे गटातूनही कोण मंत्री होणार कोण राज्यमंत्री होणार असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे विस्तार होत नसेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आम्ही आधीच केली आहे. शेतकऱ्यांची पहिली पेरणी वाया गेली आहे, दुबार पेरणीचे संकट आहे. शेतातील रोपे गळून गेली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.. पूल वाहून गेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले होते मात्र गडचिरोलीत आतील भागात जाऊ शकले नाही... एवढ्या दिवसात जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी झाली नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.