रुपाली गोटेंसोबत घडलेला 'तो' प्रसंग सांगत जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप

मग पोलीस आमची तक्रार का दाखल करुन घेत नाहीत? आव्हाडांचा सवाल
jitendra Awhad - Rupali Gote
jitendra Awhad - Rupali GoteMumbai Tak

ठाणे : भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा रिदा रशीद यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यात त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला. मात्र या सगळ्या घडामोडीत आता आव्हाड यांच्या निशाण्यावर पोलीसच आले आहेत. जामीन मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी नगरसेविका रुपाली गोटे यांच्यासोबत घडलेला तो प्रसंग सांगत पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, तुम्ही तो व्हिडीओ बघा, मला हे पूर्णपणे अडकवण्याचं षडयंत्र रचण्यात आलं. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन केलेलं हे राजकारण मी यापूर्वी कधीही बघितलं नव्हतं. तिथं पोलीस महिलांचे विचित्र पद्धतीने केस ओढत होते. मग हा ३५४ नाही का? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, कोणत्याही महिलेला पुरुष पोलिसांनी हात लाऊ नये. महिला पोलिसांचा वापर करावा. मग पुरुष पोलिसांनी कसा हात लावला?

रुपाली गोटे यांच्याबाबत काय घडलं?

कालच्या उद्घाटनावेळी आमच्या नगरसेविका रुपाली गोटे यांना चार वेळा हात लागला. चारही वेळेला त्यांनी हात लावणाऱ्याकडे बघितलं. आम्ही सांगतोय आता पोलीस केस दाखल करा. मग का पोलीस केस दाखल करत नाहीत? हात घाणेरड्या पद्धतीने, नको त्या पद्धतीने लागला आहे. त्याचा व्हिडीओ आम्ही पोलिसांना दाखवत आहोत. का वाचवायला बघत आहेत? तुम्हालाही तो व्हिडीओ दाखवतो. असं बरोबर नाही, एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचणं, असंही आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांना अटकपूर्व जामीन :

कळवा खाडी पुलाच्या उद्धघाटन कार्यक्रमाप्रसंगी घडलेल्या एका प्रसंगानंतर भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दिली आहे. या गुन्ह्यात त्यांना सध्या अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला आहे. मात्र जामीनासोबत आव्हाड यांना चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करण्याची अट घालण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in