Live Updates : राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना आदित्य ठाकरे काय म्हणाले?

Live Updates : राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना आदित्य ठाकरे काय म्हणाले?

महाराष्ट्र विधानसभेचा सामना चुरशीचा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर विरूद्ध राजन साळवी यांचा सामना

राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना आदित्य ठाकरे काय म्हणाले?

राहुल नार्वेकर यांचं नवाब मलिक यांचं अभिनंदन करत असतानाच आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कानात सांगितलेलं अडीच वर्षापूर्वी ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती असं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाल्याबाबत मी त्यांचं अभिनंदन करतो. आम्ही सर्वच जण आपल्याबद्दल बोलतो आहोत. माझ्याही आठवणी आहेत. आजचं मतदान ग्राह्य धरायचं, व्हीप कुणाचा हे सगळं नंत बोलू. देवेंद्र फडणवीस यांच्या कानात आम्ही अडीच वर्षांपूर्वी जे सांगितलं होतं ते त्यांनी ऐकलं असतं तर ही परिस्थिती अडीच वर्षापूर्वीच दिसली असती.

राहुल नार्वेकर यांचं शिवसेनेच्या सुनील प्रभू यांच्याकडून अभिनंदन

राहुल नार्वेकर यांच्या शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी अभिनंदन केलं. राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, राष्ट्रवादीत गेले त्यानंतर भाजपमध्ये गेले. मात्र आम्ही तुमच्याकडे कायदा मंत्री म्हणून पाहात होतो. मात्र तुम्हाला विधानसभा अध्यक्ष केलं गेलं. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहात होतो पण त्यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. आम्ही आमचं दुःख विसरलो आणि त्यांंच्याविषयी आम्हाला जास्त दुःख वाटलं. तसंच ३९ सदस्यांनी व्हीप झुगारून जे मतदान केलं आहे ती लोकशाहीची पायमल्ली आहे असंही परखड मत सुनील प्रभू यांनी व्यक्त केलं

"एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं "

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाहीर करताच अनेक भाजपा नेते रडू लागले. गिरीश महाजन तर डोक्यावरचा फेटा डोळ्यावर बांधून अश्रू पुसत आहेत. एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं असंही अजित पवार म्हणाले, त्यांच्या तुफान फटकेबाजीची चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला - देवेंद्र फडणवीस

आज महाराष्ट्राने नवा रेकॉर्ड केला आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. हे कायदेमंडळ असून वेगवेगळे कायदे करतो. प्रत्येकाचा विचार, आशा, अपेक्षा या सभागृहात सदस्यांच्या माध्यमातून मांडल्या जातात. त्या सोडवण्याची क्षमता या सभागृहात आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्तेतून बाहेर पडून आम्ही विरोधकांसोबत येत नवं सरकार स्थापन केलं. या राज्यात आता खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड 

विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधीमंडळातली पहिली लढाई शिंदे यांनी जिंकली आहे. राहुल नार्वेकर यांना १६४ मतं मिळाली. त्यानंतर राहुल नार्वेकर यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. सर्व सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं.

राजन साळवी यांना १०७ मतं 

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली आहेत. तर समाजवादी पक्षाचे आणि एमआयएम सदस्य तटस्थ राहिले आहेत

राहुल नार्वेकरांना मिळाली १६४ मतं

राहुल नार्वेकर हे भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना १६४ मतं मिळाली आहेत. आता या प्रस्तावाच्या विरोधातलं मतदान सुरू झालं आहे

राहुल नार्वेकर यांच्या बाजूने १४५ पेक्षा जास्त मतं 

राहुल नार्वेकर हेच विधानसभेचे अध्यक्ष होतील यात शंका नाही असंच दिसतंय कारण त्यांच्या बाजून १४५ पेक्षा जास्त मतं पडली आहेत. राहुल नार्वेकर हे बहुमताच्या संख्येपेक्षा पुढे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल आणि ऱाहुल नार्वेकर हेच अध्यक्ष होतील हे निश्चित झालं आहे

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरूवातीला राहुल नार्वेकर यांच्या बाजूने किती मतं आहेत ती मोजली जात आहेत. हे मतदान आवाजी पद्धतीने घेतलं जातं आहे. प्रत्येक आमदाराच्या जागेवर जाऊन मत मोजलं जातं आहे.

शिवसेनेनेच्या दुसऱ्या गटानेही राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला 

शिवसेनेच्या दुसऱ्या गटानेही राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे.

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडला प्रस्ताव 

विधानसभा सदस्य चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकरांना अध्यक्ष करण्यात यावं असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं.

जयंत पाटील यांनी मानले राज्यपालांचे आभार 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमची मागणी मान्य केली नव्हती. ती आता मान्य केली हे महत्त्वाचं आहे. राज्यापल नेमकी कशाची वाट बघत होते ते आता कळलं ते एकनाथ शिंदे यांना आधी कळलं असतं तर एकनाथ शिंदे यांनी हे आधीच केलं असतं असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. तसंच त्यांनी विधान परिषदेचे बारा आमदार आता तरी निवडावेत अशीही विनंती केली. त्यानंतर सभागृहात हशा पिकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले त्यांनी नाना पटोले यांचे आभार मानले. नाना पटोले यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं म्हणून आजचा दिवस आम्ही पाहतो आहोत असं फडणवीस म्हणाले आणि त्यांचे आभार मानले.

विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्ता एकमेव मंत्री हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिला. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राज्यापलांचं पत्र वाचून दाखवलं.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने, नमस्कार करून अभिवादन 

विधानसभेच्या सदस्यांचा बसण्याचा क्रम विधानसभेच्या अधिकाऱ्यांनी निश्चित करून दिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करत अभिवादन केलं. एकनाथ आणि शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं बाकं वाजवून स्वागत

शिंदे गट आणि भाजपकडून भारतमाता की जय आणि जय श्रीरामच्या घोषणा

भारतमाता की जय आणि तसंच जय श्रीरामच्या घोषणा देऊन जय भवानी जय शिवाजी या घोषणा देऊन अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात

शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं - आदित्य ठाकरे

विधानभवनातील शिवसेना विधानभवन कार्यालय आम्हीच सील केलं आहे. त्याची चावी आमच्याकडेच आहे अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आमचे आमदार पळवून कुठे कुठे नेले होते आम्ही फक्त कुलुपच लावलं आहे अशीही खोचक प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे.

या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे. अध्यक्षपदाची भाजपचे राहुल नार्वेकर तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत रंगली आहे. भाजपकडे १०६ आमदार, छोटे पक्ष, अपक्ष असे एकूण १२० आमदार भाजपच्या गटात आहेत. तर शिंदे गटाचे ४५ पेक्षा जास्त आमदार आहे. विधानसभेत आम्हाला १७० पेक्षा आमदारांचं पाठबळ मिळेल हा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भाजपचे राहुल नार्वेकर निवडून येतील असंच बोललं जातं आहे.स एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपालांनी दिला होता. त्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. आज अध्यक्षांची निवड तर उद्या (सोमवार) विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.

शिवसेनेत दोन व्हीप, एक शिंदे गटाचा एक ठाकरे गटाचा 

शिवसेनेत दोन गट पडल्याने दोन व्हीप जारी करण्यात आले आहेत. ठाकरे गटाने राजन साळवी यांना मतदान करण्यास सांगितलं आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने भाजपचे राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपालांनी दिला होता. त्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. आज अध्यक्षांची निवड तर उद्या (सोमवार) विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in