"१५ ऑगस्टला महिलांच्या सन्मानाबाबत बोलायचं आणि दोन दिवसांनी.." शरद पवारांची मोदींवर टीका

जाणून घ्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी नेमकं काय म्हटलं आहे
NCP Chief Sharad pawar criticize pm narendra modi over bilkis bano gang rape case agencies
NCP Chief Sharad pawar criticize pm narendra modi over bilkis bano gang rape case agencies

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना सोडून दिल्याच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी महिला सन्मानाच्या करायच्या आणि दोन दिवसांनी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना सोडून द्यायचं हाच महिलांचा सन्मान आहे का? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला आहे. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली आहे.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत?

"आपण सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं. महिलांबाबत ते खूप चांगलं बोलले. महिलांच्या सन्मानाबाबत त्यांनी त्यांच्या भाषणात मुद्दे मांडले. पण एकीकडे महिलांच्या सन्मानाबाबत बोलायचं आणि दोन दिवसांनी गुजरात सरकार एका महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देतं. बिलकिस बानोंवर कसे आणि किती अत्याचार झाले हे सगळ्यांना माहित आहे."

बलात्काऱ्यांना सोडून देणं हा महिलांचा सन्मान आहे का?

बिलकिस बानो प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने या प्रकरणातल्या दोषींना शिक्षा दिली. महिलांवर इतके अत्याचार केल्यानंतर गुजरातमधील सरकार या गुन्हेगारांना चांगली माणसं म्हणून सोडून देतं? हा महिलांचा सन्मान आहे का? एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांचा सन्मान करण्याबाबत भाषण करतात. दुसरीकडे बलात्काऱ्यांना सोडून दिलं जातं. या सगळ्यातून सरकारला काय संदेश द्यायचा आहे? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला.

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण काय?

"२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या बोग्या जाळण्यात आल्या. या गाडीतून अयोध्येतून कारसेवक परत आले होते. या दुर्घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगली भडकल्या.

दंगलीतून वाचण्यासाठी बिलकिस बानो आणि त्यांचं कुटुंब गाव सोडून निघून गेलं. बिलकिस बानो आणि तिचं कुटुंब जिथे लपलेलं होतं, तिथे ३ मार्च २००२ रोजी २० ते ३० लोकांचा गट आला. काठ्या आणि तलवारीने त्यांनी बिलकिस बानोंच्या कुटुंबीयांवर हल्ला केला होता.

बिलकिस बानो यांच्यावर या लोकांनी सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी बिलकिस बानो ५ महिन्यांच्या गर्भवती होत्या. इतकंच नाही, तर आरोपींनी बिलकिस बानो यांच्या कुटुंबातील ७ जणांच्या हत्या केल्या. या हल्ल्यावेळी ६ जण पळून गेले, त्यामुळे वाचले.

११ आरोपींना सोडण्याच्या निर्णयावर बिलकिस बानो काय म्हणाल्या?

"१५ ऑगस्ट २०२२ रोजी २० वर्षांपूर्वी माझ्यावर झालेला आघात पुन्हा एखाद्या संकटाप्रमाणे आदळला. जेव्हा मी ऐकलं की, ज्या ११ आरोपींनी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवलं. ज्यांनी माझी ३ वर्षांची मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली. त्या सगळ्यांची सुटका करण्यात आली. ते आता आनंदित होऊन फिरत आहेत. हे ऐकल्यानंतर मला बोलण्यासाठी शब्दच सूचत नाहीयेत. मी सुन्न झालेय आणि निःशब्द झालेय", असं बिलकिस बानो यांनी ११ जणांच्या सुटकेनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in