जितेंद्र आव्हाड यांना अटक; ठाण्याच्या चित्रपट गृहातील राड्याप्रकरणी कारवाई

याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली.
Jitendra Awhad
Jitendra AwhadMumbai Tak

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केलं आहे. चार दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं?

आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

काय झालं होतं ठाण्यात?

छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपट वादात सापडले आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं समर्थन करत जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री ठाण्यात विवियाना मॉलमध्ये जाऊन चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी तिकिटाचे पैसे परत मागणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला.

शो दरम्यान झालेल्या या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चित्रपट प्रदर्शन करण्यास विरोध, बेकायदेशीर जमाव जमवणे, प्रेक्षकांना धक्काबुक्की आदी आरोपांखाली भादंवि कलम 141, 143, 146, 149, 323, 504 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 या कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्यांच्यावर आज अटकेची कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in