IPS Deven Bharti: मुंबई: मुंबई पोलिसात (Mumbai Police) ऐतिहासिक बदल करत आयपीएस अधिकारी देवेन भारती (Deven Bharti) यांना थेट मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं आहे. आज (5 जानेवारी) याचाच पदभार स्वीकारताच देवेन भारती यांनी आपले इरादेही स्पष्ट केले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर देवेन भारती यांनी सगळ्यात आधी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांची भेट घेतील. याच भेटीनंतर देवेन भारतींनी एक असं ट्विट केलं आहे की, ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (new politics in mumbai police on singham deven bharti clarified intentions)
सगळ्यात आधी आपण पाहूयात देवेन भारती यांनी नेमकं काय ट्विट केलंय.
'मुंबई पोलीस ही एक टीम आहे. यामध्ये कोणीही सिंघम नाही.' असं एका ओळीचं ट्विट देवेन भारतींनी केलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही वेळानेच देवेन भारती यांनी अशा स्वरुपाचं ट्विट का केलं असावं यावरुन आता बऱ्याच चर्चा पोलीस दलात सुरु झाल्या आहेत. अशातच आता विवेक फणसळकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे त्याचा संदर्भ हा देवेन भारतींच्या आजच्या ट्विटशी जोडला जात आहे.
त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीने एका संयुक्त मोर्चाचं आयोजन केलं होत. हा मोर्चा मुंबईतच आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये याची जबाबदारी ही मुंबई पोलिसांवर होती. त्यामुळे स्वत: विवेक फणसळकर हे मोर्च्यातील बंदोबस्तावर जातीने लक्ष ठेवून होते. पण महत्त्वाची बाब म्हणजे याच दिवशी फणसळकरांच्या मुलीचं लग्न होतं आणि तरीही ते बंदोबस्तात व्यस्त होते.
याबाबत त्यांनी माध्यमांना मुलाखती देताना असंही सांगितलं होतं की, मुंबईची सुरक्षा हे त्यांचं प्रथम कर्तव्य होतं. म्हणून मुलीच्या लग्नाऐवजी ते बंदोबस्ताला हजर होते.
यावरुन सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सिंघम गाण्याचं म्युझिक वापरुन विवेक फणसळकर यांना सिंघम असल्याचं दर्शविण्यात आलेलं.
पण आता जेव्हा देवेन भारती यांनी विशेष आयुक्ताचा पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी ट्विट करुन म्हटलं की, मुंबई पोलीस एक टीम आहे. त्यामध्ये कोणीही सिंघम नाही. त्यामुळे आता देवेन भारतींचं ट्विट हे फणसळकरांच्या त्या व्हिडीओशी जोडलं जात आहे.
मात्र, देवेन भारतींच्या याच ट्विटमुळे आता मुंबई पोलिसात नवं राजकारण सुरु झाल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण की, मुंबई पोलीस आयुक्त पद अस्तित्वात असतानाही विशेष आयुक्त पद तयार करुन त्यावर देवेन भारती यांची वर्णी लावण्यात आली आहे. यामुळे आयुक्त फणसळकर यांचे पंख छाटण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरु आहे.