भर पावसात ४ किमी पळत गुजरात बॉर्डर गाठून शिवसेना आमदाराने गाठली मुंबई-संजय राऊत

शिवसेना आमदार कैलास पाटील हे कसे सुटून परतले ते संजय राऊत यांनी सांगितलं आहे
भर पावसात ४ किमी पळत गुजरात बॉर्डर गाठून शिवसेना आमदाराने गाठली मुंबई-संजय राऊत
osmanabad shivsena mla kailas patil escaped from clutches of eknath shinde in Rain

शिवसेना मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई य़ांच्यासह ३३ जण माझ्यासोबत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या सगळ्या बंडखोरीबाबत जेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण केल्याचा आरोप भाजपवर केला आहे. एवढंच नाही तर एक आमदार कसा पळून आला ते देखील सांगितलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

सोमवारी विधान परिषदेचं मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतल्या काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचं असं आमदारांना सांगितलं. यानंतर संध्याकाळी विविध वाहनांमध्ये बसवून ठाण्याच्या दिशेने नेण्यात आलं. ठाणे ओलांडून गेल्यानंतरही वाहनं थांबत नव्हती. पुढे एकनाथ शिंदे आहेत त्यांना भेटून पुढे जायचं आहे असं या सगळ्यांना सांगण्यात आलं. ही सगळी वाहनं महाराष्ट्र गुजरात सीमेवर थांबवण्यात आली.

यावेळी कैलास पाटील यांच्या मनात पाल चुकचुकल्याने त्यांनी लघुशंकेचा बहाणा केला. अंधारात कुणालाही दिसमार नाही या पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला. अंधाराचा रस्ता, पाऊस या सगळ्यात चार किमी भिजत चालत जाऊन त्यांनी हे अंतर कापलं. समोरच्या रस्त्यावरून येणाऱ्या एका दुचाकीची लिफ्ट घेतली. दुचाकीस्वार गाव आल्याने थांबला त्यानंतर कैलास पाटील यांनी पुन्हा पायी प्रवास सुरू केला. एका ट्रकला लिफ्ट मागून ते दहीसरला पोहचले. त्यानंतर आपल्या वाहनाने त्यांनी वर्षा बंगला गाठला. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

गुजरातमध्ये आमदारांना अक्षरशः पळवून नेण्यात आलं आहे. तसंच त्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आम्हाला विश्वास आहे की हे सगळे परत येतील एवढंच नाही तर एकनाथ शिंदेही परत येतील. एकनाथ शिंदे तसंच त्यांच्यासोबतचे आमदार परतले नाहीत तर कारवाई होईल असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन थेट गुजरात गाठले आहे. आपल्यासोबत ३५ आमदार आहेत असा दावा देखील शिंदेंनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांनी प्रस्ताव दिला आहे. राज्यात हा राजकीय भूकंप उडताच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदार खासदारांची बैठक बोलवली आणि आपल्या नेत्यांना त्यांनी कानमंत्र दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांना आवाहन केले आहे.

तुमचं काही नाही, माझं काही-नाही तर भाजपसोबत जायचं कशाला?. आता बोलत आहेत की भाजपसोबत चला…जेव्हा भाजपसोबत होतो तेव्हा आपल्याला कमी त्रास झाला का? मग आता भाजपसोबत कसं जायचं? असे सवाल मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदार खासदारांना विचारले आहेत.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की आपण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. ते माझं ऐकतील हा मला पुर्ण विश्वास आहे, ते लवकरच आपल्यामध्ये असतील. राष्ट्रवादी- काँग्रेस आपल्या सोबत आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले आहेत. काही वेळापुर्वी महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थीत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आहे असे दोन्हीही पक्षाचे नेते म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in