एकनाथ शिंदे गटाचं पक्षचिन्ह आणि नाव ठरलं? निवडणूक आयोगाला पत्र लिहून मांडणार भूमिका

शिंदे गटाची एक बैठक रात्री वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली
Party symbol and name of Eknath Shinde group decided?
Party symbol and name of Eknath Shinde group decided?

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. अशात शिवसेनेत जे दोन गट पडले आहेत त्यातल्या एकनाथ शिंदे गटाची बैठक वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत पक्षचिन्ह आणि पक्षाचं नवं नाव काय असेल याची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटाची नेमकी काय चर्चा झाली?

शिंदे गटाची जी बैठक वर्षावर पार पडली त्या बैठकीत पक्षाच्या चिन्हाबाबत आणि नावाबाबत सर्व अधिकार कार्यकारिणी घेईल हे एकमताने स्पष्ट करण्यात आलं. तसंच शिंदे गट आता निवडणूक आयोगाला पत्र लिहून यासंदर्भातली विनंती करणार आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्याचा निर्णय शनिवारी आला. त्यानंतर रविवारी विविध बैठका झाल्या त्यात ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. तिकडे ठाकरे गटात उद्धव ठाकरे यांनीही जनतेशी संवाद साधून भावनिक आवाहन केलं. त्यानंतर रात्री उशिरा शिंदे गटाची बैठक पार पडली. त्या बैठकीत नवं चिन्ह आणि नवं नाव यावर चर्चा झाली.

काय असू शकतं नवं नाव? काय असू शकतं नवं चिन्ह?

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली त्यात पक्षाचं नवं चिन्ह म्हणून तुतारी, गदा आणि तलवार या तीन चिन्हांवर चर्चा झाली. या पैकी एक चिन्ह मिळालं तर ते शिंदे गटाला हवं आहे. तर नावाबाबत शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब या दोन नावांपैकी एक नाव दिलं जावं अशीही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र अंधेरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चिन्ह आणि नाव लवकर निवडावं लागणार आहे असं चित्र आहे. अशात शिंदे गट काय निर्णय घेणार? त्यांच्या गटाचं चिन्ह काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाची शिंदे गटाकडून खिल्ली

शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे रविवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतचे ४० आमदार, १२ खासदार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र या भाषणाची शिंदे गटाने खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात नेहमीचंच रडगाणं गायलं असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in