Advertisement

'धोका देणाऱ्यांचं राज्य आहे, जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार,' नाराज बच्चू कडू असं का म्हणाले?

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. असं स्वतः त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Bachhu kadu on eknath shinde
Bachhu kadu on eknath shinde

मंगळवारी शिंदे आणि फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार झाले. एकूण. 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पहिल्या विस्तारात स्थान मिळेल, असं वाटत होतं. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज आहेत. असं स्वतः त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची बच्चू कडूंची कबुली

मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज आहात का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी बच्चू कडू यांना विचारला. या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले ' थोडी नाराजी आहे, नाराजी नाही असं नाही. परंतु इतकीही नाराजी नाही की, शिंदे गट सोडून इतर पक्षात जाणार, अशा स्पष्ट शब्दात बच्चू कडूंनी मंत्रिपद न मिळाल्याच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली. क्षणिक नाराजी आहे, पण अजून पुढचा मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यात जर जागा मिळाली नसती तर वेगळी गोष्ट असती, बच्चू कडू म्हणाले.

'मंत्रिपदासाठी शिंदे गटात गेलो नाही' : बच्चू कडू

आपण मंत्रिपदासाठी शिंदे गटात गेलो नसल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं. काही मुद्द्यांना घेऊन आपण शिंदेंना पाठिंबा दिला आहे. जर ते पूर्ण होत नसतील तर आम्ही विचार करू, असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्याला मंत्रिपद देणार असल्याचा शब्द दिला आहे. त्यांनी खूप विश्वासाने मंत्री बनवणार असल्याचं सांगितलं आहे. जर पहिल्या विस्तारात मंत्री बनवलं नाही तर शेवटच्या विस्तारात बनवावं, अशी इच्छा बच्चू कडूंनी बोलून दाखवली.

पुढचा मुख्यमंत्री प्रहारचा होणार असल्याचा पुनरुच्चार

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, पुढे काय होईल कोणी सांगू शकत नाही. हे राजकारण आहे, राजकारणात काहीही होऊ शकतं. कोण कुठे जाईल, हे ठरवू शकत नाही, असं बच्चू कडू म्हणाले. तर यापूर्वी बच्चू कडू यांनी पुढचा मुख्यमंत्री प्रहार पक्षाचा होणार, असा दावा केला होता. यावर प्रश्न विचारलं असता पुढचा मुख्यमंत्री प्रहारचाच असणार, मग तो मी किंवा माझ्या पक्षाचा आमदार असेल, असं पुन्हा एकदा बच्चू कडूंनी विश्वास व्यक्त केला.

'पैसा आणि सत्ता असं देशात समीकरण' : बच्चू कडू

संजय राठोड यांच्यावर आरोप असताना त्यांना मंत्रिपद दिलं. यावर बोलताना आरोप होत असतात मात्र ते सिद्ध होणं गरजेचं आहे, असं बच्चू कडू म्हणाले. आरोप करणाऱ्यांच्या मंत्रिमंडळात राठोडांचा समावेश करण्यात आला, यालाच तर राजकारण म्हणतात, असा टोला बच्चू कडूंनी लगावला. सत्तेपेक्षा कोणी मोठं नाही. पैसा आणि सत्ता असं समीकरण देशात आहे आणि हे तोडण्यासाठी सगळ्यांना बदलावं लागेल.

'जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार': बच्चू कडू

'धोका देणाऱ्यांचं राज्य आहे. राज्य कोणाचाही असो, जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार.' राजकारणात नीतिमत्ता वगैरे काही नाही, जो पळणार, जो राजकारण करणार तो मोठा होणार, असं बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवतात. त्यांच्या हृदयात राम आणि बाळासाहेब आहे. उगाच तोंडात राम आणि हातात सूरी नाही तर आमच्या तोंडात राम आणि हातात काम आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in