
२१ जूनला महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. आपल्यासोबत ४० आमदार घेऊन त्यांनी हे बंड पुकरालं. हे बंड आपलंच पक्षनेतृत्व म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे हे सत्तेवरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. आता १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. भाजपने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. अशात प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देणार का?
राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलैला होते आहे. यासाठी NDA ने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उभे आहेत. या दोघांमधली लढत कशी रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशात द्रौपदी मुर्मू यांचा विजय सोपा कसा होईल यासाठी भाजप पूर्ण प्रयत्न करताना दिसते आहे. जास्तीत जास्त पक्षांचा पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना मिळावा यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
या सगळ्या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे हे भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार का? हा प्रश्न कायम आहे. यावरून विविध अंदाजही वर्तवले जात आहेत. मात्र अद्याप उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे समजू शकलेलं नाही. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत १९ पैकी ११ खासदार उपस्थित होते. या बैठकीत बहुतांश खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांनाच तुम्ही पाठिंबा द्यावा ही विनंती उद्धव ठाकरेंना केल्याचं कळतं आहे.
उद्धव ठाकरे यांनी खासदारांची ही जी बैठक बोलावली होती त्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. त्यांनी मात्र उद्धव ठाकरेंनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. अशात आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं आवश्यक आहे.
महाराष्ट्रात २१ जूनपासून ज्या काही घडामोडी घडल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंना त्यांचं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. त्यांचा पक्षही फुटला आहे. असं सगळं असतानाही उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला तर त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जातील. आम्ही शिवसेनेपासून काही काळासाठी वेगळे झालो होतो असं वक्तव्या काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलं होतं. ते वक्तव्य सूचक होतं. शिवसेना काही काळासाठी लांब गेली होती आता परत जवळ येऊ शकते म्हणजेच उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ येऊ शकतात हेच त्यांनी यातून सुचवलं होतं.
हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून हे दोन पक्ष म्हणजेच शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात. तसं झालं तर ती आणखी मोठी घडामोड ठरणार आहे. द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देणं ही या घडामोडीची नांदी ठरू शकते.
दुसरीकडे समजा उद्धव ठाकरे यांनी जर यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला तर याचा अर्थ थेट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी त्याचा संबंध जोडला जाऊ शकतो. महाविकास आघाडी आपल्याला पुढेही कायम ठेवायची आहे असं वक्तव्य शरद पवार यांनीही केलं होतं. मात्र शिवसेनेशी याबाबत बोलणं झालेलं नाही असंही त्यांनी सांगितलं.
सध्या महाराष्ट्रात जी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे त्यात उद्धव ठाकरे काय करणार हे पाहवं लागणार आहे. द्रौपदी मुर्मू यांना जर उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला तर भाजपसोबत जाण्याची ती कदाचित सुरूवात ठरू शकते. मात्र यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला तर मात्र भाजपला ते शत्रूच मानतात असा संदेश जाऊ शकतो. तसंच हे दोन पक्ष भविष्यात एकत्र येणार की नाही हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.