Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचं महाराष्ट्राला पत्र; म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून...'

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली. महाराष्ट्राचा निरोप घेताना राहुल गांधींनी पत्रातून भावना व्यक्त केल्यात...
Rahul gandhi letter
Rahul gandhi letter

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात दाखल झालीये. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशच्या भूमीत पाऊल ठेवण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेला निरोपाचं पत्र लिहिलंय. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात घालवण्यानंतर राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांसह फुले-शाहू-आंबेडकर संतांचा उल्लेख भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधींनी महाराष्ट्रातील जनतेला लिहिलेलं पत्र

राहुल गांधी म्हणतात, 'महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा शुभारंभ देगलूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशिर्वाद घेऊन सुरू झाला आणि शिवाजींचा मातृ जिल्हा (जिजाऊ मांसाहेबांचा जन्म जिल्हा) बुलढाणा येथून ती मध्य प्रदेशमध्ये जात आहे. महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संतांच्या विचारापासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा, तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नम्रपणे वाटचाल करत आहोत."

राहुल गांधी पुढे म्हणतात, "महाराष्ट्रातील जनतेनं या यात्रेला प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिलं. आमच्यासोबत बरोबरीने चालले, लाखोंच्या संख्येनं नांदेड आणि शेगाव येथील सभेमध्ये सहभागी झाले. या सर्व आबालवृद्ध, युवक, महिला यांच्या प्रेमाने आमचे ह्रदय, मन भरून आले आहे."

Rahul gandhi letter
राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ५ बदल झालेत!

"महाराष्ट्रात आम्हाला भारतातील समृद्ध विविधतेचं दर्शन झाले. या यात्रेदरम्यान, आम्हाला अनेक ऐतिहासिक मंदिरांना, गुरूद्वारांना भेटी देता आल्या तसेच विठ्ठलाचे पाईक वारकरी, बौद्ध भिक्कू आणि सुफी संप्रदायातील लोक यांच्यासोबत चालताना मनस्वी आनंद झाला. आम्ही भगवान बिरसा मुंडा यांची 157वी जयंती देशातील इतर आदिवासी बांधवाप्रमाणे साजरी केली. प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी महिला शक्तींना घेऊन (शक्तीमार्च) महिला सन्मानाचा संदेश दिला तसेच या प्रसंगी हजारो आदिवासी महिलांशी संवाद साधता आला व 10 हजार महिलांच्या मेळाव्याला संबोधित केले, हे आम्ही आमचे भाग्य समजतो."

"संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही अशा लोकांचे ऐकले जे कठोर परिश्रम करतात परंतु त्यांच्या तपस्यांचे फळ त्यांना मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न, त्याची कारणमीमांसा करता असे लक्षात आले की, कृषी साहित्याच्या किंमतीत झालेली प्रचंड भाववाढ, शेतमालाच्या भावात असलेली अनियमितता आणि फसलेली पीकविमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दृष्टच्रकात ढकलेले आहे. हे पाहून मन व्यथित झाले. अनेक बेरोजगार युवक उच्च शिक्षण घेऊनही काम नसल्याने हतोत्साहित झालेले, आपल्या स्वप्नाचा चुराडा झालेले पाहिले."

"आदिवासी समुदाय हा या देशाचा मुलनिवासी आहे आणि त्याच्या अधिकारावर गदा आलेली आहे. वन हक्क जमीन 2006 चा कायदा कशा पद्धतीने पायदळी तुडवला जात आहे, हे सुद्धा लक्षात आले. या सगळ्या समस्यांची कारणमिमांसा करताना लक्षात आले की, भाजपाचे काही लोकांच्या हाताममध्ये सत्ता आणि संपत्ती सीमित ठेवण्याचे धोरण याला कारणीभूत आहे. एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात संस्कृती, धर्म, जात आणि भाषा याचा वापर करून उभे करून संघर्ष उभा करण्याच्या भाजपच्या नितीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे", असं राहुल गांधी निरोपाच्या पत्रात म्हणतात.

Rahul gandhi letter
Blog : मला कळलेली भारत जोडो यात्रा...
"महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी शाहु-फुले, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हा राहिलेला आहे. आणि हा जाज्वल्य विचार देशाला नेहमी दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकवण्याचा प्रयत्न अनेक नागरी समुदाय, पुरोगामी विचारांचे कलाकार, साहित्यिक, सिने क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र हे करत आहेत आणि त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे त्यासाठीही मी त्यांचा कायम ऋणी राहिन. या प्रवासात वृत्तवाहिन्या व प्रिंट माध्यमातील माध्यम कर्मींच्या सहभागाकरीता मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो."

"आम्ही अतिशय विनम्रतापूर्वक छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी महाराष्ट्रात मध्य प्रदेशात जात असताना संताच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देत आहोत. आपण दिलेले प्रेम, प्रचंड मोठा प्रतिसाद आणि केलेले आदरातिथ्य याने आम्हाला एक नवीन ऊर्जा दिली आहे."

धन्यवाद!

खा. राहुल गांधी

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in