नास्तिक म्हणजे काय रे भाऊ?, शरद पवार, भगतसिंग यांच्यात काय आहे साम्य?

Atheists: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे नास्तिक आहेत अशी टीका त्यांच्यावर सातत्याने करण्यात येते. पण नास्तिकतेबाबत देशासह संपूर्ण जगात नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेऊया सविस्तरपणे.
नास्तिक म्हणजे काय रे भाऊ?, शरद पवार, भगतसिंग यांच्यात काय आहे साम्य?
raj thackeray and bjp allegations against sharad pawar for atheism how many atheists are there in the world

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच आपल्या एका जाहीर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) हिंदू शब्दाची अॅलर्जी असून ते स्वत: नास्तिक आहेत अशी टीका केली होती. या टीकेनंतर शरद पवारांनी राज ठाकरेंना उत्तर देताना ते स्वत: नास्तिक असल्याने त्याच दृष्टीकोनातून धर्माकडे पाहतात असं उत्तर दिलं होतं. यानंतर या वादात भाजपनेही उडी घेतली आहे.

साताऱ्यातील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी जातीयवादासंदर्भात बोलताना जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा उल्लेख केला. यावर भाजपने पवारांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करत पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी-देवतांचे बाप काढलेत अशी टीका केली.

एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणात आस्तिक कोण आणि नास्तिक कोण यावरून रणकंदन सुरू आहे. तेव्हा आपण समजून घेऊया की नास्तिक असणे म्हणजे नेमकं काय आणि नास्तिक असणं म्हणजे हिंदूविरोधी असतं का.

नास्तिक म्हणजे तो व्यक्ती जो देवाला किंवा देवाच्या निगडित कोणत्याही परंपरा किंवा व्रतवैकल्यासारख्या गोष्टींना मानत नाही. थोडक्यात त्याचा देवावर विश्वास नसतो.

संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या म्हणण्यानुसार ‘आस्तिक’ म्हणजे ईश्वर अस्तित्वात आहे असे मानणारा व ‘नास्तिक’ म्हणजे ईश्वरावर श्रद्धा नसणारा, असे आपण समजतो. वेदप्रामाण्य मानणारे आस्तिक निरीश्वरवादी असू शकतात. सांख्यांमध्ये असे विचारवंत होते. प्रकृती आणि पुरुष एकत्र येण्यासाठी तिसऱ्या-ईश्वर नावाच्या ‘एजन्सी’ची गरज नाही. ती आपोआप घडणारी घटना आहे, असे हे सांख्य मानायचे.

2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणताही धर्म न मानणाऱ्या नास्तिक लोकांची संख्या 33,000 हून जास्त आहे. महाराष्ट्रात कोणताही धर्म न मानणाऱ्या नास्तिक लोकांची संख्या 9650 हून जास्त आहे.

भारतात जशी ही परिस्थिती आहे तशी जगातही फार वेगळी नाही. नास्तिकवादाच्या अभ्यासक मुग्धा कर्णिक यांच्या मते, नास्तिक्याचा विचार मान्य असलेले, तो उघडपणे मान्य असल्याचे सांगणारे नास्तिक असे जगभरातील लोकसंख्येच्या 2% ते 13% असतील. धर्म मान्य नसलेले लोक जगाच्या लोकसंख्येच्या 10% ते 22% असतील असा गॅलप इंटरनॅशनलने केलेला सर्वे दर्शवतो.

2015 मधे 65 देशांमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणात असे दिसले की अगदी खात्रीपूर्वक आपण नास्तिकच आहोत, असे सांगणारे लोक 11% होते. तर प्यू रिसर्च सेंटरने 2012 मध्ये 230 देशांचा अभ्यास करून त्याआधारे असा निष्कर्ष काढला की जगातील 16% लोक कोणत्याही धर्माशी स्वतःला निगडीत मानत नाहीत. पण यातील अनेकजण तरीही काही धार्मिक श्रध्दा आणि परंपरांचे पालन करतात.

ख्रिश्चन बहुसंख्येने असलेल्या देशामध्ये बघितलं तर फ्रान्समधे पक्क्या नास्तिकांची टक्केवारी चाळीस इतकी आहे. जगभरातील सर्व देशांपेक्षा चेक रिपब्लिक, स्वीडन, नेदरलॅण्ड्स, एस्टोनिया, बेल्जियम, जर्मनी ही राष्ट्रे 27 टक्के ते 37 टक्के या दरम्यान नास्तिक लोकसंख्या बाळगून आहेत. ब्रिटनमध्येही पंचवीस टक्के लोक नास्तिक आहेत.

भारतातील अनेक मान्यवर मंडळींनीही नास्तिक असण्याबाबत आपली मतं मांडली होती.

शहीद भगतसिंग (Bhagat Singh) यांनी मी नास्तिक का आहे. या आपल्या निबंधात सविस्तर आपली प्रतिक्रिया मांडली आहे. ते म्हणतात की, 'माझ्या सहकार्‍यांत मी ‘एकाधिकारशहा‘ म्हणूनच ओळखला जात होतो. माझे स्नेही बटुकेश्वर दत्त हे सुद्धा कधी-कधी मला तसे म्हणत. ऐट किंवा अगदी काटेकोरपणे सांगायचे झाले तर ‘अहंकार‘ हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो आहे की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रद्धेपर्यंत आलो आहे.'

प्रख्यात अभिनेते डॉ. श्रीराम लागू हे नास्तिक होते. त्यांनी याबद्दल एक लेखही लिहिला होता. ज्याचं शीर्षक होतं 'टाइम टू रिटायर गॉड.' या लेखात त्यांनी ईश्वराला रिटायर करून टाकायला हवं असं आपलं मत मांडलं होतं. या त्यांच्या मतावरून त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं होतं.

अंधश्रध्दा निर्मलून चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या एका लेखातून आपली प्रखर मतं मांडली आहेत.

'सगळे धर्म अंधश्रध्दांवर उभे राहिले आहेत या अर्थाने मी सर्वधर्मभाव मानतो. ईश्वरावरील व्यक्तिगत श्रध्दा वाद घालण्यासाठी नाही परंतु जेव्हा ईश्वरनिष्ठ म्हणतात त्यांची श्रध्दा हेच अंतिम सत्य, त्यावेळी खरे प्रश्न उपस्थित होतात.'

2012 मध्ये स्वतंत्र बाजार संशोधन आणि सर्वेक्षण संस्थांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणात देश जसजसे समृद्ध होत जातात तसतशी धार्मिक असल्याचा दावा करणारी लोकसंख्या कमी होत असल्याचेही दिसून आले.

raj thackeray and bjp allegations against sharad pawar for atheism how many atheists are there in the world
भारतात चुकीचे विचार पसरवून राजकारणासाठी वातावरण दुषित केलं जातंय-शरद पवार

आणखी एक मनोरंजक मुद्दा असा होता की, ज्या देशांमध्ये जास्त शिक्षण आहे त्या देशांमध्ये स्वतःला धार्मिक समजणारी लोकसंख्या कमी आहे. सर्वसाधारणपणे, गरीब आणि कमी विकसित समजल्या जाणाऱ्या राष्ट्रांमध्ये जगातील नास्तिकांची लोकसंख्या कमी आहे. श्रीमंत आणि औद्योगिक देशांमध्ये वाढती नास्तिकता असल्याचं दिसून आलं आहे.

Related Stories

No stories found.