"मराठी माणसाला डिवचू नका" राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून खरमरीत इशारा
MNS Leader Raj Thackery Pens A Letter to Governor Bhagatsing Koshyari
MNS Leader Raj Thackery Pens A Letter to Governor Bhagatsing Koshyari

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर त्यांच्याविषयी टीकेची झोड उठते आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एक पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. मराठी माणसाला डिवचू नका असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिला आहे. राज ठाकरे यांनी एक खरमरीत पत्र राज्यपालांना लिहिलं आहे.

काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?

"कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही" असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत. याचबाबत आता राज ठाकरे यांनी टीका केली आहे.

राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे?

कोश्यारींची होशियारी? असं नाव या पत्राला देण्यात आलं आहे.

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे, म्हणून आपल्याविरूद्ध बोलायला लोक कचरतात, मात्र आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.

महाराष्ट्रातील मराठी माणसानं येथील मनं आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच इतर राज्यातील लोक इथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?

उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका इतकंच आत्ता आपल्याला सांगतो..

जय महाराष्ट्र!

राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे पत्र लिहून टीका केली आहे.

काय म्हटलं आहे मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी?

मागे सावित्रीमाई बद्दल आता मराठी,महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य. हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली आहे.हे खपवून घेतलं जाणार नाही. मराठी,महाराष्ट्राची सभ्यता,संस्कृतीचा अवमान होत असेल तर राज्यपाल या पदाचा मान,मरातब गेला चुलीत. ज्या विषयात कळत नाही तिथे चोमडेपणा करू नका असं म्हणत मनसेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांचीही राज्यपाल कोश्यारीवर टीका

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका केली आहे. ज्यांना वाटतं की आर्थिक प्रगती हीच प्रगती आहे ती त्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे. मराठी माणसाच्या त्यागामुळे मुंबई आणि महाराष्ट्र घडला आहे. मराठी माणसांमुळेच इतरांना फायदा झाला आहे. राज्यातील आधीच्या सरकारने जी धोरणं आखली त्यामुळे मुंबई, महाराष्ट्रात उद्योग आणि व्यवसाय आले. त्यामुळेच महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा प्रगत झाला आहे. महाराष्ट्राचा अपमान कधीच सहन करणार नाही. असं म्हणत संदीप देशापांडे यांनीही टीका केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in