Rajya sabha Election 2022 : दोन मुद्द्यांमुळे भाजपच्या यादीची मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात आणि देशात सगळ्याचं लक्ष राज्यसभा निवडणुकीकडे लागलं आहे. आपापले उमेदवार विजयी करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आकड्यांची जुळवा जुळव सुरू आहे. त्यात आता महाराष्ट्रात आणि देशात भाजपने राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या निवडीवर चर्चेनं डोकं वर काढलं आहे.

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या आणि होणाऱ्या जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने २२ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यातील महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने महाराष्ट्रात दोन जागा जिंकून येण्याचं संख्याबळ असताना तिसऱ्या जागेवरही उमेदवार दिला आहे.

महाराष्ट्रातील उमेदवार निवडीची का होतेय चर्चा?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने तीन उमेदवार उतरवले आहेत. यात भाजपने केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी खासदार धनंजय महाडिक आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी दिलीये.

निष्ठावंतांचा मुद्दा…

ADVERTISEMENT

भाजपने तीन उमेदवार दिले असून, दोघांच्या उमेदवारीवरून निष्ठावंताचा मुद्दा समोर आला आहे. पियूष गोयल आणि विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. या जागांवर उमेदवार देताना भाजपने पियूष गोयल यांना पुन्हा उमेदवारी दिलीये, पण उर्वरित दोन जागांवर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिकांना रिंगणात उतरवलं आहे.

ADVERTISEMENT

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भाजपकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारीवेळी हा मुद्दा उपस्थित होतोय. भाजपकडून पक्षातील निष्ठावंताना बाजूला ठेवून आयात केलेल्यांना संधी दिली जातेय, असा सूर उमटत आलेला आहे.

गेल्यावेळी विधान परिषद निवडणुकीतही पंकजा मुंडेंना तिकीट दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ऐनवेळी रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आता २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेल्या धनंजय महाडिकांना भाजपने उमेदवारी दिलीये. तर माजी कृषीमंत्री अनिल बोंडेही २०१४ मध्ये भाजपत आलेले आहेत. २०१९ मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

मुस्लीम चेहरा गायब

भाजपने २२ जणांना उमेदवारी दिलीये, पण या २२ जणांमध्ये एकही मुस्लीम चेहरा नाही. भाजपने यापूर्वी मुख्तार अब्बास नकवी, सय्यद जफर इस्लाम आणि एम.जे. अकबर यांना राज्यसभेत पाठवलं होतं. तिघांचाही कार्यकाळ संपतोय. मात्र, भाजपकडून या तिघांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

महत्त्वाचं म्हणजे मुख्तार अब्बास नकवी हे सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहे. ते पुढील सहा महिन्यांत खासदार म्हणून निवडून आले नाही, तर त्यांचं मंत्रिपदही जाऊ शकतं. राज्यसभेत बाजूला ठेवलेल्या नकवी यांना रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत उतरवण्याची चर्चा आहे.

लोकसभेत भाजपचा एकही मुस्लीम खासदार नाही. भाजपने २०१९ च्या निवडणुकीत सहा मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले होते, पण या सहा जणांचाही पराभव झाला. सध्याच्या एनडीए सरकारमध्ये लोकसभेत केवळ एकच मुस्लिम खासदार असून, तो लोक जनशक्ती पार्टीचा आहे.

राष्ट्रपतींच्या कोट्यातून मुस्लिमांना प्रतिनिधीत्व?

राज्यसभेत राष्ट्रपतीकडून खासदार नियुक्त केले जातात. या जागांपैकी ७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे भाजपकडून आता राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून मुस्लिम चेहरा राज्यसभेत आणला जाऊ शकतो, असंही बोललं जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT