
महाराष्ट्रामध्ये आमदारांच्या मतदानावर घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणी खोळंबलेली असतानाच तिकडे राजस्थानच्या राज्यसभा जागांचा निकाल लागला आहे, तिथे काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला हे तिघेही राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस उमेदवारांसोबतच भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. भाजपचे घनश्याम तिवारी हे विजयी झाले आहेत.
तीनही जागांसाठी काँग्रेसकडे आवश्यक बहुमत असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. मात्र भाजपने अपक्षांना उभे करून घोडेबाजाराचा प्रयत्न केला. आमच्या आमदारांच्या एकजुटीने या प्रयत्नाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला अशाच पराभवाला सामोरे जावे लागणार आहे असेही अशोक गेहलोत म्हणाले आहेत.
दरम्यान राजस्थानमधला निकाल लागला आहे. हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटकचा निकाल येणं अजून बाकी आहे. महाराष्ट्रातचा विचार केला तर भाजपने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीनेही भाजपच्या दोन आमदारांच्या मतावर आक्षेप घेतला आहे.
मतदानावर आक्षेप घेतलेल्या आमदारांची नावं
यशोमती ठाकूर (काँग्रेस)
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
सुहास कांदे (शिवसेना)
सुधीर मुनगंटीवार (भाजप)
रवी राणा (अपक्ष)