
रात्रभर रंगलेल्या राज्यसभा निवडणुकीत अखेर भाजपने तिन्ही जागांवर विजय मिळवला. या विजयाने महाविकास आघाडीला झटका बसला असून, याचे विधान परिषद निवडणुकीवर काय परिणाम होतील याबद्दल चर्चा सुरू झालीये. या निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार दिलेले आहेत. या निवडणुकीत पाचवा उमेदवार निवडून येण्याबद्दल फडणवीसांनी महत्त्वाचं भाष्य केलं.
राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"भाजपने तीन उमेदवार उभे केले होते. ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्हाला ऑफर देण्यात आली की, तुम्ही तिसरा उमेदवार परत घ्या. तिकडे (विधान परिषद निवडणूक) आम्ही तुमचा पाचवा उमेदवार आहे, तिथे माघार घेऊ. त्यावेळी आम्ही त्यांना नम्रपणे सांगितलं होतं की, आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. राज्यसभा सदस्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाचं धोरण मोदीजी तयार करतात. या सगळ्या धोरणात्मक बाबींमध्ये राज्यसभा सदस्य महत्त्वाचा घटक असल्यामुळे जसं तुम्ही सांगता त्याच्या उलट आपण करा."
"त्यावेळी आम्ही त्यांना लॉजिक सांगितलं होतं की, पक्ष म्हणून सर्वात जास्त मतं आमच्याकडे आहेत. तुम्ही आघाडी आणि अपक्षांच्या आधारावर बोलत असला तरी सुद्धा. त्यांनी ते मान्य केलं नाही. मला अतिशय आनंद आहे की, आमचा तिसरा उमेदवार निवडून आला आहे," असं फडणवीस म्हणाले.
"पीयूष गोयल यांना ४८ मते मिळाली. अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली. दोघांना प्रत्येकी ४८ मते मिळाल्यानं अनेकांना असं वाटलं की आमचा तिसरा उमेदवार येणार कसा? परंतु आम्ही त्याची रचना योग्य प्रकारे केली होती. त्यामुळे माजी खासदार धनंजय महाडिक निवडून आले."
"काल दिवसभरात जे काही आम्ही बघत होतो. आम्ही सगळे शांत होतो. पण काही लोक मात्र, माध्यमांशी बोलत होते. ट्विट करत होते. एकप्रकारचा दुराभिमान आणि गर्व याचा दर्प सत्ता जेव्हा डोक्यात जाते. तेव्हा माणसाचा व्यवहार कसा होतो, याचं चित्र हे काल सातत्याने बघायला मिळत होतं," असा टोला फडणवीसांनी लगावला.
"मला आश्चर्य वाटतं की आम्ही नियमानुसार तक्रार केली. त्यांनी तक्रार केली. खरं म्हणजे उशिर त्यांच्या तक्रारीमुळे झाला. आमची तक्रार निकाली निघाल्यानंतर त्यांची तक्रार गेल्यामुळे पुन्हा दोन-अडीच तास आयोगाला काम करावं लागलं. असं असताना यांची सगळ्यांची रेकॉर्ड ठरलेली आहे. कुणाचीही रेकॉर्ड बदलत नाही."
"महाराष्ट्राला वेठीस धरलं. तुम्ही थोडी महाराष्ट्र आहात. तुम्ही उमेदवार आहात. तुम्ही चूक केलीये आणि संविधानाने आम्हाला अधिकारच दिलाय. आम्ही तक्रार केली, तर महाराष्ट्राला वेठीस धरलं. त्यांनी तक्रार केली, तर स्वागतार्ह. एकीकडे संविधानाची शपथ घेतलेले मंत्री तुरुंगात गेल्यानंतर, त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर मंत्रिमंडळात ठेवतात. केवळ मंत्रिमंडळात ठेवतात असं नाही. अजूनही त्यांच्या विभागाचे निर्णय त्यांच्या फोटोसह जाहीर करतात. वर्क फ्रॉम ऐवजी वर्क फ्रॉम जेलची परिस्थिती बघायला मिळतेय," असंही फडणवीस म्हणाले.
"आम्ही एक तक्रार केली की, यांनी संविधानाची पायमल्ली. आकांडतांडव करण्याचं तंत्र महाविकास आघाडीच्या घटकांनी विकसित केलं आहे. त्या आकांडतांडवाचा काल पूर्ण पर्दाफाश झालाय. कालच्या निवडणुकीनंतर आज ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे. तो अंतर्विरोध आज त्यांच्या प्रतिक्रियेत दिसतोय."
"एक मत जे बाद झालं. ते बाद झालं नसतं आणि नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळाली असती, तरीही भाजपचं निवडून आली असती. इतकी मतं आम्ही घेतलेली आहेत."
"मी कुणाला सल्ला देण्यासाठी बसलेलो नाही. तरीही सरकारने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. सरकारच्या आमदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. भयानक संताप आहे. कारण सरकारचं काम थांबलेलं असतं आणि राज्यात काहीच होत नाही, त्यावेळी त्या रागाचा सामना आमदारांना करावा लागतो. सरकारी पक्षाचे आमदार त्याचा सामना करत आहेत," असं विधान फडणवीस यांनी केलं.
"विवेक बुद्धीला स्मरून आम्ही सांगितलं होतं की आम्हाला मतदान होईल. आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. मी त्या सोप्या मानत नाही. तरीही आम्ही उमेदवार का उभा केलाय. याचं कारण अंतर्विरोध व्यक्त होण्याची जागा सरकार देऊ शकत नाही. अंतर्विरोध व्यक्त होण्यासाठीची जागा विरोधी पक्ष देऊ शकतो आणि म्हणून आम्ही उमेदवार दिले आहेत. त्यांच्या माध्यमातून विरोध व्यक्त होईल. तीही जागा आम्ही प्रयत्नांची शर्थ करून निश्चितपणे निवडून आणू हा आम्हाला विश्वास आहे," असं सांगत फडणवीसांनी विधान परिषद निवडणुकीबद्दलचे आपले इरादे स्पष्ट केले.