"त्या थडग्यावर तुमची नातवंडंही थुंकतील" उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर जळजळीत टीका

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
Saamana Editorial Uddhav Thackeray Attacks on Eknath Shinde and Group Also About BJP
Saamana Editorial Uddhav Thackeray Attacks on Eknath Shinde and Group Also About BJP

शिवसेनेत पडलेली उभी फूट, त्यानंतर झालेलं सत्तापरिवर्तन. निवडणूक आयोगाच्या दारात गेलेला वाद, पक्षचिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत. शिवसेनेचं काय होणार ? हा प्रश्न पडलेला असतानाच ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावही मिळालं आहे. त्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर जोरदार प्रहार करण्यात आले आहेत.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

सत्याला आणि खुनाला वाचा फुटतेच असं म्हणतात. मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी केली. या अन्यायाविरोधात महाराष्ट्राचं मन पेटून उठलं असताना मिंधे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षणममंत्री केसरकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे सत्य आणि न्यायाचा विजय आहे असं म्हटलं आहे. जगात न्याय आहे असे केसरकरसारख्या बाजारबुणग्याला वाटणं साहजिक आहे. कारण हा माणूस कधीच कुणाचा होऊ शकला नाही. अनेक पक्षांत फिरून हे महाशय शिवसेनेत आले. मंत्रिपदाचं गाजर दिसतात मिंधे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसेनेवर दिल्लीचा आघात म्हणजे महाराष्ट्राचा घात हा स्वाभिमानी विचार त्यांच्या मनाला शिवणार नाही.

भाजपचे आणि त्यांचे सूत्रधार नामर्द

भाजप आणि त्यांचे सूत्रधार नामर्द आहेत. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेचं अस्तित्व कागदोपत्री संपवण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांना मुंबईवर ताबा मिळवायचा आहे. आम्ही सांगितलं की मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र देशाचा आहे. मुंबईवर ताबा मिळवण्यापेक्षा चीनने गिळलेल्या लडाख आणि अरूणाचल प्रदेशातील जमिनींवर ताबा मिळवल. तुम्हाला शिवसेनेचा पराभव समोरासमोर करता येणं शक्य नाही. जनतेचं विराट सैन्य आमच्यासोबत आहे. समोरासमोर लढायची हिंमत नसल्यानेच मिंधे गटातल्या बृहन्नडांना आणि शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला. ज्यामुळे महाराष्ट्र आकांत करतो आहे.

छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरेंनीही शिवसेना सोडली पण...

याआधी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तीशः आमच्यावर कठोर शब्दात टीका केली. पण ज्या शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादातून झाला. ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसाच्या संघटनेला शिवसेना हे ज्वलंत नाव दिलं आणि ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केलं, त्या शिवसेनेचं अस्तित्व मिटवण्याचं अधम आणि नीच कृत्य जसं एकनाथ शिंदे या गारद्यानं केलं तसं या मंडळींनी केलं नाही.

आम्ही शिवरायांच्या विचारांवरच चालणारे

चारशे वर्षांपूर्वी शिवरायांचा जन्म हा होणं हा ईश्वरी अंश होता, ईश्वरचा तो पुनर्जन्म होता. त्या जन्माने महाराष्ट्राच्या दऱ्या खोऱ्या आनंदून गेल्या. जुलमी मोगलांच्या विरोधात लढण्याचं नवं बळ मिळालं. हिंदुत्व जागं झालं आणि भवानी तलवार मोगलांविरोधात तुटून पडली. त्या तलवारीने महाराष्ट्राचे दुश्मन आणि अनेक गारदी गाडले गेले. आज महाराष्ट्र पुन्हा त्याच वळणावर, त्या परिस्थितीत उभा आहे. या परिस्थितीला आम्ही शरण जाणार नाही. मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. बेईमान गेंड्यांची कातडी आहे. असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

शिवसेनेचा आत्मा कसा बदलणार?

शिवसेनेचा आत्मा कसा बदलेल? महाराष्ट्राच्या जनतेने खोक्यांच्या चिता पेटवल्या की गेंड्याची कातडीही जळून जाईल. छे छे यांना जाळायचं कसं? ही तर अफझल खान आणि औरंगजेबाच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुश्मनांना दफन करायला हवं. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढंच लिहायचं येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचं गाडलं आहे. त्या थडग्यावर तुमची नातवंडंही थुंकतील. शिवसेना शिवरायांचा अंश आहे तो अंश तुम्ही कसा मिटवणार?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in