"शिंदे-फडणवीस सरकार फक्त अजित पवारांना घाबरतं" धनंजय मुंडे यांची तुफान फटकेबाजी

पालकमंत्री अद्याप का नेमले नाहीत? असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला आहे
Shinde-Fadnavis government is only afraid of Ajit Pawar Dhananjay Munde's attack in his Beed Speech
Shinde-Fadnavis government is only afraid of Ajit Pawar Dhananjay Munde's attack in his Beed Speech

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जाते आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री न नेमल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. एवढंच नाही तर हे सरकार फक्त अजित पवारांना घाबरतं असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याबाबत?

अजित पवार यांचं मराठवाड्यावर पहिल्यापासून प्रेम आहे. अजित पवार हे जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. बीड जिल्ह्यात शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठीचा निर्णयही अजित पवार यांनी घेतला. कोव्हिडचा एक काळ आपण पाहिला. या काळात लोक एकमेकांना घरात घेत नव्हते. मुंबईत जर एखाद्याचा सख्खा भाऊ काम करत असेल तरीही गावी त्याला घरात घेतलं जात नव्हतं.

एवढा वाईट काळ आपण पाहिला. मात्र या काळातही अजित पवार यांनी माणुसकी जिवंत कशी राहिल याकडे पाहिलं. सकाळी सात वाजल्यापासून मंत्रालयात ते उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राकडे लक्ष देत होते. त्यांच्यासारख्या नेत्याच्या हाताखाली काम केल्याचा मला अभिमान वाटतो असंही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

अजित पवारांना हे सरकार घाबरतं

आज आम्ही सत्तेत नाही. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतो. सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार हे सत्तेवर कसं आलं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. हे सरकार आल्यापासून बेशिस्तीने वागताना दिसतं आहे. मात्र हे सरकार विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांना घाबरतं. समोरचे किती मातबर राजकारणी असू द्या सरकार बेशिस्तीत वागू लागलं की विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांना शिस्तीत आणू शकतात असंही धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसंच राज्यात अजून पालकमंत्री न नेमल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांनाही धनंजय मुंडेंचा टोला

१२० आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपद भाजपला मिळालं. भाजपला उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. नवं सरकार आणून भाजपला काय फायदा झाला? असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी बीडमधल्या सभेत विचारला आहे. अजित पवारांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याला मुबलक निधी मिळाल्याचा पुनरूच्चार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणात केला. अजित पवार यांच्या काळात सरकार शिस्तीत चालत होतं असंही त्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in