'MVA'ला चौथं चाक प्रकाश आंबेडकरांचं; अजून २ स्टेपन्या तयार : संजय राऊत

Sanjay Raut on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary : अजून दोन पक्ष महाविकास आघाडीमध्ये येणार?
Sanjay Raut on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary
Sanjay Raut on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary Mumbai Tak

मुंबई : महाविकास आघाडीच्या रिक्षाला वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या रुपाने चौथं चाक लागलं आहे. अजून दोन स्टेपन्या तयार आहेत, असं म्हणतं अजून दोन पक्ष महाविकास आघाडीमध्ये येणार असल्याचं सूचक वक्तव्य शिवसेना (UBT) चे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डाव्होसला गेले होते. आम्हाला माहिती नाही. आपल्याला फक्त दापोली माहिती आहे. तर डाव्होसला महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी कार्यालय थाटलं होतं. तिथं आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे फंटर बसले होते. तेव्हा दोन-चार गोरे लोकं आले. आता हे गडबडले, आता त्यांच्याशी बोलायचं काय? मग तिथल्या कोणतरी सांगितलं, हे लक्झेंमबर्गचे पंतप्रधान आहेत.

ते आपल्या मुख्यमंत्र्यांना म्हणाले तुम्ही इथं कसं? त्यावर समोरून म्हटलं हो आम्ही येथे, किती खोके देऊ तुम्हाला? येता का आमच्या पक्षात? त्यावर लक्जेमबर्गचे पंतप्रधानांनी सांगितलं मी तर मोदींचाच माणूस आहे. अच्छा, मी पण मोदींचा माणूस आहे. त्यानंतर त्यांनी एकत्र सेल्फी काढला आणि मोदींना पाठवण्याची विनंती केली, असा किस्सा संजय राऊत यांनी ऐकवला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय कागदी वाघ :

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत आज संपत आहे. यावर संजय राऊत म्हणाले, पक्षप्रमुखपद जनतेने बहाल केलं आहे. शिवसेना ही धगधगती संघटना आहे. शिवसेना एकच आहे. दुसरी शिवसेना या देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही. रक्तातून निर्माण झालेला शिवसेनेचा इतिहास आहे तो कुठल्याही शाईने मिटवता येणार नाही. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे कागदी प्रकार आहेत. आपण कागदी वाघ नाही. शिवसेनेचा इतिहास अनुभवायचं असेल तर ती मोदींच्या शिवसेनेनं महाराष्ट्राच्या सीमापार जाऊन पहावं, असा टोलाही राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.

आम्हीही दगडच, बाळासाहेबांनी शेंदूर फासला :

यावेळी संजय राऊत यांनी एका विनोदाचा संदर्भ देत रंजक कथा ऐकवली. ते म्हणाले, एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी तलावात एक दगड फेकला. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक लोक होते. त्यांनी तिथल्या लोकांना विचारलं दगड का बुडाला? कोणी म्हटलं दगड जड होता, कोणी काय सांगितलं. मात्र तिथं संजय राऊत नावाचा एक अतिशहाणा माणूस होता. तो म्हणाला, साहेब दगड बुडाला कारण त्याने तुमचा हात सोडला. आम्हीही दगडच आहोत, बाळासाहेबांनी आम्हाला शेंदूर फासला, असं राऊत यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in