
(Shiv sena (UBT) will support Shubhangi Patil in nashik MLC)
मुंबई : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शनिवारी (१४ जानेवारी) मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. काँग्रेसने मतदारसंघ गमावल्यानंतर आता इथून ठाकरे गट मैदानात उतरला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ काँग्रेसने शिवसेना (UBT) पक्षाला सोडला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (UBT) ने मातोश्रीवर झालेल्या बैठकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती आहे. मात्र त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, शिवसेना (UBT) कडून ताकद मिळाल्यानंतर "अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, अब राजा वही बनेगा जो हकदार होगा", असं म्हणतं शुभांगी पाटील यांनी रणशिंग फुंकलं आहे. मातोश्री बंगल्यावरील बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. शिवसेना (UBT) आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अनुकूलता दाखविल्यामुळे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यापुढे कडवं आव्हान उभं राहिल्याची चर्चा आहे.
शुभांगी पाटील यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी शिक्षण पूर्ण केलं आहे.
पाटील या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत.
त्याशिवाय महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या त्या राज्याध्यक्ष आहेत.
पाटील महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.
तसेच पाटील महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत.
याशिवाय शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
शुभांगी पाटील मूळच्या राष्ट्रवादीच्या :
महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या मूळच्या राष्ट्रवादीच्या आहेत. काही काळ राष्ट्रवादीसोबत काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना स्थापन केली आणि त्यामाध्यमातून काम सुरु केलं. पुढे २१ सप्टेंबर २०२२ रोजी शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला.
नाशिक पदवीधरसाठी भाजपकडून आग्रही होत्या. मात्र भाजपने एबी फॉर्मसाठी त्यांचा विचार न केल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतर देखील त्या भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील होत्या. मात्र भाजप अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचं चित्र आहे, हे ओळखून त्यांनी तात्काळ मातोश्रीसोबत संपर्क साधला.