'एक नेपाळी अंगावर शाल घेऊन महाराष्ट्रात फिरतोय', अनिल परब असं का म्हणाले?, सभागृहातील 'त्या' विधानाची Inside स्टोरी
Maharashtra:अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना 'नेपाळी' असा उल्लेख केला. ही टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांच्यावर केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: विधान परिषदेत आज शिवसेना (UBT) गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी एका वक्तव्यातून राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. परब यांनी "एक नेपाळी अंगावर शाल घेऊन महाराष्ट्रात फिरतोय" असे म्हणत नाव न घेता राणेंना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या वक्तव्यावेळी विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक आमदार गालातल्या गालात हसताना दिसले.
पार्श्वभूमी आणि वक्तव्य
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना अनिल परब यांनी हिंदू धर्म आणि सामाजिक एकतेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "माझ्या सोसायटीत एक नेपाळी वॉचमन आहे. तो रात्रभर ओरडत असतो, 'जागते रहो', त्याला वाटतं त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. पण तसं नाही. सध्या असाच एक नेपाळी अंगावर शाल घेऊन महाराष्ट्रात फिरतोय आणि म्हणतोय की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो. पण हिंदू धर्म वाचवायला आम्ही समर्थ आहोत." या वक्तव्यातून परब यांनी नितेश राणे यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या कार्यशैलीवर खोचकपणे निशाणा साधला.
हे ही वाचा>> Nikhil Wagle : आधी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी माफी मागावी, 'त्या' हल्ल्याचा उल्लेख, वागळे काय म्हणाले?
नितेश राणे यांनी अलीकडेच 'मल्हार सर्टिफिकेशन' नावाच्या वेबसाइटचे उद्घाटन केले होते, ज्याद्वारे मटण दुकानांसाठी हिंदू प्रमाणीकरणाची योजना जाहीर केली होती. या योजनेला परब यांनी "जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न" असे संबोधत टीकास्त्र सोडले. परब यांच्या "नेपाळी" या उल्लेखाला राणेंच्या या कृतीशी जोडले गेले आहे.
सभागृहातील प्रतिक्रिया
परब यांच्या या वक्तव्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. सत्ताधारी बाकांवरील काही आमदारांनी यावर आक्षेप घेतला, तर ठाकरे गटाच्या आमदारांनी परब यांच्या टिप्पणीला पाठिंबा दर्शवला. उद्धव ठाकरे हे सभागृहात उपस्थित असताना ही टीका ऐकून हलकेसे हसताना दिसले, सभापतींनी मध्यस्थी करत अनिल परब यांना पुढील मुद्द्यांकडे वळण्यास सांगितले, परंतु या वक्तव्याची चर्चा सभागृहाबाहेरही पसरली.
हे ही वाचा>> VIDEO: शिंदे गटाचा आपसातच राडा, महिलेने शिंदेंच्या माजी नगरसेवकाला भर रस्त्यात बेदम चोपलं!
दरम्यान, आता अनिल परब यांनी केलेल्या या बोचऱ्या टिकेला नितेश राणे नितेश राणे नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या वादामुळे विधान परिषदेतील पुढील चर्चांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील हा शाब्दिक संघर्ष आगामी निवडणुकांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.