अभिजीत दिपके नागपुरात दीक्षाभूमीवर गेल्यावर काय झालं? पाहा व्हिडीओ
abhijeet dipke : अभिजीत दीपके यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. जंतरमंतरवरील आंदोलन आणि CJP कार्यकर्त्यांच्या कोठडीच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अभिजीत दिपके नागपुरात दीक्षाभूमीवर गेल्यावर काय झालं? पाहा व्हिडीओ
Abhijit Dipke at Dikshabhumi Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
abhijeet dipke : CJP (कॉकरोच जनता पार्टी) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. जंतरमंतर येथे तिरंगा फडकवल्याप्रकरणी CJP चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर दीपके यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. दीक्षाभूमीवर अभिवादन केल्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरच देश चालतो आणि कोणत्याही परिस्थितीत देशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा लादता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
"आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करू नये"
जंतरमंतरवर तिरंगा फडकवल्याबद्दल कार्यकर्त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तिरंगा फडकवणे हा या देशात गुन्हा झाला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारला आणीबाणी लागू करायची असेल, तर ती अधिकृतपणे लागू करावी; अनधिकृतपणे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण करू नये, असे ते म्हणाले. आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना अटक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. संबंधित प्रकरणात तपास करायचा असेल, तर तो करावा; मात्र आंदोलन करणाऱ्यांवर केवळ आरोप करून कारवाई करू नये, असेही त्यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या भूमिकेला मदत केल्याचा आरोप
निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही दीपके यांनी प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयोगाकडून मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील दोन वर्षांत 13 कोटी लोकांची मते वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मतदारयादीत नावच नसेल, तर मतपत्रिकेवर मतदान कसे करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे लोकशाही आणि संविधानासमोर प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयानेही काही प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. CJP ही स्वतंत्र दबावगट म्हणून काम करणारी संघटना असून, तिचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि इतर पक्षांकडून होणारी आंदोलनेही याच मुद्द्यासाठी असल्याचे सांगत, देशात काय घडत आहे याविरोधात प्रत्येकाने आवाज उठवणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवरूनही दीपके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. प्रत्येक विषयात पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेचा उल्लेख करण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना मदत करणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल बोलताना सामाजिक न्याय आणि अन्याय सहन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओबाबतही त्यांनी आक्षेप घेतला. तो व्हिडिओ एडिट करण्यात आल्याचा दावा करत, आजीच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतरही आपल्याला भावाशी किंवा वकिलाशी बोलू दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री साडेतीन वाजता कुटुंबीयांना फोन करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व मुद्द्यांवर आवाज उठवण्यासाठी आपण दिल्लीला जात असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले.
