महाराष्ट्रात येताच अभिजीत दीपकेची आंदोलनाबाबत मोठी घोषणा, प्लॅन जाहीर

मुंबई तक

Abhijeet Dipke : महाराष्ट्रात परतल्यानंतर CJP नेते अभिजीत दीपके यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा केली. दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

Abhijeet Dipke
Abhijeet Dipke
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात येताच अभिजीत दीपकेची आंदोलनाबाबत मोठी घोषणा

point

नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचं सांगितलं

Abhijeet Dipke Press Conference : न्यायालयाने सुटका केल्यानंतर CJP नेते अभिजीत दीपके आजीच्या निधनामुळे दिल्लीहून महाराष्ट्रात परतले आहेत. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली. ‘काहीही झालं तरी आंदोलन थांबणार नाही, आम्ही शांत बसणार नाही आणि घाबरणारही नाही,’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्ली पोलिसांवर टीका केली. आंदोलनाबाबत कोणताही बाँड लिहून दिलेला नसल्याचं सांगत आपण पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : MPSC च्या विद्यार्थ्यांनी अध्यक्षांविरोधात रान पेटवलं, आता राज्य सरकारचा मोठा निर्णय

"आजीच्या निधनानंतर कुटुंबीयांशी बोलण्याची संधी दिली नाही"

अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. आपल्या आजीच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर गावात राहणाऱ्या भावाशी बोलण्यासाठी आपण पोलिसांकडे फोन मागितला होता, मात्र त्यांनी फोन दिला नाही, असा आरोप त्यांनी केला. भावाचा मोबाईल नंबर पाठ नसल्यामुळे स्वतःचा फोन दोन मिनिटांसाठी देण्याची विनंती केली होती. त्यातून नंबर काढून पोलिसांना देता आला असता, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय आपल्या वकिलांशी बोलण्याची परवानगीही देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. रात्री साडेतीन वाजता दिल्ली पोलिसांनी आई-वडिलांना फोन करून अटकेची माहिती देण्यास सांगितलं, यामागचा हेतू काय होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आजीच्या निधनानंतर कुटुंबीयांशी बोलण्याची संधी न मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

‘आम्ही काय आतंकवादी होतो का?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दीपके यांनी त्यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप केला. ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी संपूर्ण दिल्ली बंद करण्यात आली, रस्ते आणि मेट्रो बंद करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना आत बंद करून ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. विमानातून अटक करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी, ‘आम्ही काय आतंकवादी होतो का?’ असा सवाल केला. आपण महात्मा गांधी यांचा संदेश देणारा टी-शर्ट घातला होता, असंही त्यांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांच्या कारवाईदरम्यान महिला आणि मुलींशी गैरवर्तन झाल्याचे तसेच मारहाण झाल्याचे आरोप करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप झाले, त्यांचं प्रमोशन करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. पोलिसांनी अशा कारवाईबाबत विचार करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.