बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची युती, राम शिंदे एकटे पडले का?

मुंबई तक

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात काय उलथापालथ होणार? जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Ahilyanagar Politics
Ahilyanagar Politics
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची युती

point

राम शिंदे एकटे पडले का?

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळापासून एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचे चित्र आहे. संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी आमदारांनी हजेरी लावली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यावर या बैठकीत एकमत झाल्याची चर्चा असून विखे आणि थोरात यांच्यात जुळलेल्या या नव्या समीकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सुजय विखेंनी घेतले थोरातांचे आशीर्वाद

या बैठकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे दोन्ही गटांमधील प्रदीर्घ काळ चाललेला वाद आणि सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांची घेतलेली भेट. सुजय विखे यांनी या बैठकीत थोरातांचे आशीर्वाद घेतल्याने विखे-थोरात यांच्यातील राजकीय कटुता काही प्रमाणात शमल्याचे मानले जात आहे. जिल्हा बँकेवर नेहमीच या दोन मोठ्या घराण्यांचे वर्चस्व राहिले असून स्थानिक राजकारणातील सत्ता राखण्यासाठी आणि बँकेचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वपक्षीय सहमतीचा मार्ग अवलंबला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीला जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख नेते उपस्थित होते, ज्यामुळे या बिनविरोध पॅनलच्या योजनेला सर्वपक्षीय पाठबळ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा : उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्णयाबाबत गंभीर प्रश्न

राम शिंदे अन् निलेश लंके अनुपस्थित का?

मात्र, या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच खासदार निलेश लंके यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. राम शिंदे यांनी यापूर्वीच जिल्ह्यात स्वतंत्रपणे फिरून स्वतःचे पॅनल उभारणीची तयारी सुरू केली होती. परंतु, पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी विखे पाटलांनी थेट थोरातांसोबत संधान साधून रणनीती आखल्यामुळे राम शिंदे हे एकाकी पडल्याची चिन्हे आहेत. राम शिंदे यांनी या युतीवर अप्रत्यक्षरीत्या टीका केल्याने ते या सर्वपक्षीय पॅनलमध्ये सहभागी होणार की स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : मैसूर मसाला डोश्याच्या आत निघाला मेलेला उंदीर; 'या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

भाजपमधील अंतर्गत गटबाजी

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यात सुरू झालेला सुप्त संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकाच पक्षात आणि सरकारमध्ये असूनही या दोन नेत्यांमधील स्थानिक वर्चस्वाचा वाद आता टोकाला पोहोचला आहे. विखे आणि थोरात यांच्या या राजकीय युतीमुळे अहिल्यानगर भाजपमधील अंतर्गत गटबाजी अधिक तीव्र झाली असून, या वादावर भाजपचे सर्वोच्च नेतृत्व किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही तोडगा काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.