अजित पवार विमान अपघात प्रकरण : शेवटचे 3 तास, सीसीटीव्ही आणि RTI ची माहिती

Ajit Pawar plane crash : माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वीच्या हालचाली आणि शेवटच्या 45 मिनिटांतील घडामोडींबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. माहिती अधिकारातून मागवलेल्या सीसीटीव्ही फुटेजबाबत मुंबई पोलीस आणि विमानतळ सुरक्षा विभागाने काय उत्तर दिले?

ADVERTISEMENT

Ajit Pawar plane crash
Ajit Pawar plane crash
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अजित पवार विमान अपघात प्रकरण

point

शेवटचे 3 तास, सीसीटीव्ही आणि RTI ची माहिती

Ajit Pawar plane crash : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यापासून ते विमान अपघाताच्या तपासापर्यंत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले. अजित पवार यांचा अपघात होण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांना काही फोन आले होते. या फोनमुळे त्यांचा संध्याकाळी प्रवास करण्याचा कार्यक्रम रद्द झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने बारामतीला जाण्याचे निश्चित झाले, असा दावा रोहित पवार यांनी यापूर्वी केला होता. या संदर्भात त्यांनी खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही नेत्यांची नावे घेतली होती. मात्र, अलीकडील पत्रकार परिषदेत त्यांनी शेवटच्या 45 मिनिटांतील घडामोडींचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्रालयातून दोन सचिव एक महत्त्वाची फाईल घेऊन देवगिरी बंगल्यावर गेले होते. या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे अजित पवार यांचा संध्याकाळी निघण्याचा कार्यक्रम रद्द झाला. दुसरीकडे, अजित पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेल्या त्यांच्या वरिष्ठ चालकांनीही रात्रीच पुण्याला जाण्याचे नियोजन असल्याचे सांगितले होते. पुण्यात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्याने बारामतीला जाण्याचा विचार होता. मात्र, शेवटच्या क्षणी नियोजन बदलले आणि अजित पवार यांनी विमानाने प्रवास केला.

हेही वाचा : "एक सच्चा हिंदू म्हणून, हे माझे कर्तव्य..."; शिव-पार्वतीचा 'तो' फोटो शेअर करत राहुल गांधींचं भाजप-RSS ला प्रत्युत्तर

नितीन यादव यांचे माहिती अधिकारांतर्गत दोन स्वतंत्र अर्ज

या प्रकरणातील काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत दोन स्वतंत्र अर्ज केले होते. यापैकी एका अर्जात मुंबई पोलिसांकडे 28 जानेवारी 2026 रोजी पहाटे 6 ते सकाळी 9 या वेळेतील देवगिरी बंगला ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आले होते. अजित पवार विमानतळावर पोहोचले, त्यांच्यासोबत कोण होते, त्यांना सोडण्यासाठी कोण आले होते किंवा त्यांच्या आसपास संशयास्पद व्यक्ती होत्या का? याची माहितीही मागवण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी ही माहिती देण्यास नकार दिला. मागितलेली माहिती सार्वजनिक कामकाजाशी किंवा सार्वजनिक हिताशी संबंधित नसून, ती वैयक्तिक स्वरूपाची आहे. ही माहिती उघड केल्यास संबंधित व्यक्तीच्या खासगी आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप होऊ शकतो, असे पोलिसांनी उत्तरात म्हटले. त्यामुळे माहिती अधिकार कायद्यातील संबंधित तरतुदीनुसार अर्ज नाकारण्यात आला. यावर अर्जदार नितीन यादव यांनी आक्षेप घेतला. अजित पवार यांचे देवगिरी निवासस्थान हे खासगी घर नसून शासकीय निवासस्थान होते. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यास अडचण नसावी, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्ज नाकारल्यानंतर त्यांनी प्रथम अपीलही केले. त्यावर मुख्य नियंत्रण कक्षाकडे उपलब्ध असलेली माहिती पुरवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मागितलेली संपूर्ण माहिती त्यांना मिळाली नाही.

हेही वाचा : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मोठी उलथापालथ; खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांची अचानक माघार

RTI अर्जांमधून कोणती माहिती समोर आली? 

दुसऱ्या अर्जामध्ये विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली होती. यावर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयाने उत्तर दिले. सध्याच्या नियमांनुसार सीसीटीव्ही डेटा आणि फुटेज केवळ संबंधित महासंचालकांच्या मंजुरीनंतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि सुरक्षा यंत्रणांना उपलब्ध करून दिले जाऊ शकतात, असे या कार्यालयाने स्पष्ट केले. तसेच माहिती अधिकार कायद्यातील कलम 8(1)(h) चा उल्लेख करत तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्यास अशी माहिती देता येत नसल्याचे सांगितले. संबंधित विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणेला आधीच देण्यात आल्याचेही उत्तरात नमूद आहे. बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हे फुटेज तपास यंत्रणेकडे देण्यात आले होते. सुरुवातीला कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल झाली आणि त्यानंतर प्रकरण बारामती पोलिसांकडे वर्ग होऊन तपास सीआयडीकडे गेला. त्यामुळे तपासाशी संबंधित माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याची भूमिका संबंधित कार्यालयाने घेतली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचाही मुद्दा चर्चेत आला आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा तपास झाला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तपास यंत्रणांचा वापर करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असे फडणवीस यांनी अमित शहा यांच्या उपस्थितीत बारामती येथे बोलताना सांगितले. यापूर्वी त्यांनी विधानसभेतही या प्रकरणात काही चुकीचे घडले असल्यास संबंधितांना शोधून काढण्याचे विधान केले होते. दुसरीकडे, रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर या प्रकरणातील काही लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, अपघाताच्या तपासातून गेल्या आठ महिन्यांत नेमके काय निष्पन्न झाले? हा प्रश्न अद्याप कायम आहे. जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांच्यापैकी कोणाला तपासाचा निष्कर्ष सांगण्यात आल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे तपासात आतापर्यंत कोणत्या बाबी स्पष्ट झाल्या? कोणत्या गोष्टींची चौकशी बाकी आहे आणि तपासाचा निष्कर्ष अद्याप सार्वजनिक का करण्यात आलेला नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अजित पवार यांच्या अपघातामागे नेमक्या कोणत्या परिस्थिती होत्या, याबाबत तपास यंत्रणांनी केलेल्या तपासातून समोर आलेली माहिती जनतेसमोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.