संजय राठोड पुन्हा अडचणीत? एकनाथ शिंदेंना दिलेल्या पत्रात गंभीर आरोप
राज्याचे अन्न व औषध प्रशासनन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं असून, त्यात राठोडांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर जावं लागलेले संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. यावेळी अडचणीत येण्याचे कारण म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं असून, त्यात राठोडांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एमएससीडीए अर्थात द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने टाकलेल्या लेटरबॉम्बने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री पद गमवावं लागलेल्या संजय राठोडांवर यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत.
हेही वाचा >> या ४ कारणांमुळे शिवसेनेला घ्यावा लागला होता संजय राठोडांचा राजीनामा
द महाराष्ट्र स्टेट केमिस्टस् अॅण्ड ड्रगिस्टस् असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात ‘मंत्रालय नसून, भ्रष्टालय’ असा उल्लेख करत म्हटलं आहे की, “राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्र्यांचं कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून, भ्रष्टालय असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील औषध विक्रेते मंत्र्यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त झाले आहेत.”
संजय राठोड यांच्यावर काय आरोप करण्यात आलेत?
पत्रात म्हटलं आहे की, “राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानाच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरता प्रशासनाद्वारे त्यांचे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरिता निलंबित करणे अथवा कायमस्वरुपी रद्द करणे, अशी कारवाई केली जाते.”









