राजीनामा होताच दीपकेंच्या वडिलांना अश्रू अनावर, प्रधान यांचं नाव घेत थेट...
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. अभिजीत दीपकेंच्या वडिलांनी धर्मेंद्र प्रधानांचे आभार मानत मोठी प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राजीनामा होताच दीपकेंच्या वडिलांना अश्रू अनावर,
प्रधान यांचं नाव घेत थेट...
Abhijit Dipke's father : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर अभिजित दिपके यांच्या वडिलांनी आपली अत्यंत भावुक आणि समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ही केवळ एका व्यक्तीची किंवा आमची मागणी नव्हती, तर देशभरातील तमाम तरुणांची ही मोठी मागणी होती, ती अखेर पूर्ण झाली आहे. ही घटना सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि फायदेशीर ठरणार आहे. सरकारने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचेही आभार मानले. राजीनामा देताना देखील प्रधान यांनी मोठेपण दाखवत विद्यार्थ्यांना आंदोलनावर जास्त वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले, ही प्रशंसनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
अखेर यश आले
या निर्णयाबाबत आपल्याला कशी माहिती मिळाली, याविषयी सांगताना अभिजित यांचे वडील म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते घरात विश्रांती घेत होते. त्यांच्या एका मित्राने फोन करून त्यांना टीव्हीवर काय चालले आहे हे पाहण्यास सांगितले. त्यावेळी टीव्ही बंद असल्याने त्यांनी लगेचच आपल्या मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी पाहिली. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी लढा सुरू होता, तिला अखेर यश आल्याचे पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि त्यांच्या मनावरचा मोठा ताण हलका झाला.
हे ही वाचा : प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेची पहिली प्रतिक्रिया, सरकारकडे 'त्या' मागण्या
'प्रचंड यातना होत होत्या'
हा लढा सोपा नव्हता, तर अत्यंत खडतर आणि मानिसकरित्या खचवून टाकणारा होता, असे सांगताना अभिजित यांचे वडील अधिकच भावुक झाले. इतक्या लहान वयात आपल्या मुलाला असा भीषण संघर्ष करावा लागेल, याची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. या आंदोलनादरम्यान अभिजितला लोकांच्या शिव्या आणि मारहाण सहन करावी लागली, त्याच्यावर शाई फेकली गेली. एवढेच नाही तर काही संघटनांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याचा प्रचार करत त्याला 'आतंकवादी' ठरवण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी त्याला 'फॉरेन फंडिंग' मिळत असल्याचा खोटा आरोप केला. हे सर्व ऐकून एक वडील म्हणून त्यांना प्रचंड यातना आणि वेदना होत होत्या, परंतु त्या परिस्थितीत ते शांत राहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते.
हे ही वाचा : 'जबाबदारीकडून आता सुधारणांकडे...' प्रधानांच्या राजीनाम्यानंतर वांगचुक यांची प्रतिक्रिया समोर
'तर त्याला मिठीत घेतले असते...'
गेल्या दीड महिन्यापासून, म्हणजे अभिजित अमेरिकेतून भारतात परतल्यापासून संपूर्ण कुटुंब खूप मोठ्या मानसिक दबावाखाली आणि तणावात जगत होते. मात्र, आज मुलाने मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे वडिलांचे मन अभिमानाने आणि आनंदाने भरून आले आहे. आपल्या मुलाच्या या संघर्षाचे फळ मिळाल्याचे पाहून त्यांचा आनंद शब्दात मांडता येत नाही. जेव्हा अभिजित त्यांच्यासमोर येईल, तेव्हा त्याला काही न बोलता थेट मिठीत घेणार असल्याचे सांगत एका बापाने आपल्या मुलाच्या विजयावर अत्यंत प्रेमाचा आणि अभिमानाचा वर्षाव केला.
