मोठी बातमी : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहिणीची गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरु
Ashok Kharat Case : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात माजी महिला आयोग अध्यक्षांच्या भगिनी आणि पुतण्याची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोठी बातमी : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहिणीची गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरु
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेमध्ये चाकणकरांची चार खाती असल्याची माहिती समोर..
Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळातील बड्या व्यक्तींच्या नातेसंबंधांपर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सख्ख्या बहिणीची, म्हणजेच प्रतिभा चाकणकर यांची आज शिर्डी पोलीस ठाण्यात गेल्या तीन तासांपासून चौकशी सुरु आहे.. या प्रकरणाचे गांभीर्य इतके वाढले आहे की, केवळ प्रतिभा चाकणकरच नव्हे, तर त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर देखील पोलिसांच्या चौकशीला सामोरे जात आहे. या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, भोंदू बाबाच्या प्रकरणाचे धागेदोरे किती खोलवर रुतलेले आहेत, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. नाशिक आणि शिर्डी परिसरातील या मोठ्या कारवाईने प्रशासकीय यंत्रणा देखील सतर्क झाली असून या प्रकरणातील प्रत्येक आर्थिक व्यवहार आता तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे.
समता पतसंस्थेतील व्यवहारांमुळे पोलिसांचा संशय
भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या आर्थिक व्यवहारांच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेमध्ये चाकणकर कुटुंबाची तब्बल 4 बँक खाती असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधील आर्थिक व्यवहारांचा खरातशी काही संबंध आहे का आणि त्यातून पैशांची काही अफरातफर झाली आहे का, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. याच संशयावरून आज सकाळी 9 वाजेपासूनच प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची शिर्डी पोलीस ठाण्यात कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी केली जात असून, मागील 3 तासांपासून दुय्यम अधिकारी कक्षात या आई आणि मुलाचा जबाब नोंदवला जात आहे. या खात्यांमधील व्यवहारांची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
राजकीय वळण आणि कायदेशीर कारवाईचा बडगा
या प्रकरणाचे पडसाद यापूर्वीच राजकीय स्तरावर उमटलेले पाहायला मिळाले आहेत. अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांना आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण काहीसे शांत होईल असे वाटत असतानाच, आता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची थेट पोलीस चौकशी सुरू झाल्याने या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. राजकीय नात्यांमुळे या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यभर होत आहे.
सध्या शिर्डी पोलिसांकडून सुरू असलेली ही चौकशी अत्यंत गोपनीय आणि कडक पद्धतीने पार पडत असल्याचे समजते. 3 तास उलटून गेल्यानंतरही प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर अद्याप पोलीस ठाण्यातच असून, त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीवर पुढील तपासाची दिशा अवलंबून आहे. अशोक खरातच्या काळ्या साम्राज्यात नेमकी किती राजकीय गुंतवणूक आहे आणि या व्यवहारांमध्ये कोणाकोणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, हे आता तपासात उघड होईल. पोलिसांच्या या कारवाईमुळे आगामी काळात आणखी काही मोठ्या नावांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरात प्रकरणाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली असून, पोलीस आता समता पतसंस्थेतील त्या 4 खात्यांची आणि त्यातील व्यवहारांची बारकाईने तपासणी करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक वेगवान केला असून आरोपी खरातच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीवर आता लक्ष ठेवले जात आहे.









