फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने महाराष्ट्रात चर्चांना उधाण; CM पदाबाबत अखेर स्वतःच सांगितलं!
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर खुद्द फडणवीसांनी याबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्लीः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा एकदा ते मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, खुद्द फडणवीस यांनी या सर्व अटकळी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत, “मला महाराष्ट्राच्या जनतेने निवडून पाठवले आहे आणि नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. मी या जबाबदारीचे निर्वहन करत राहीन,” असे स्पष्ट केले.
दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान मोदींची भेट
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
ग्रामीण विकास, मुंबई मेट्रो, रेल्वे, विमानतळ, बंदरे आणि रस्ते बांधकाम यांसह महाराष्ट्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राला केंद्राकडून शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
