'मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन', शेतकऱ्यांना भेटून धनंजय मुंडेंचा शब्द, काय घडलं?

मुंबई तक

dhananjay munde : बीडमधील दुष्काळी परिस्थितीची आमदार धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना पीक विमा आणि तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचा शब्द त्यांनी दिला.

ADVERTISEMENT

dhananjay munde
dhananjay munde
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन'

point

शेतकऱ्यांना भेटून धनंजय मुंडेंचा शब्द, काय घडलं?

बीड जिल्ह्यात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी पाहणी केली. अंबाजोगाई तालुक्यातील राडी परिसरात तसेच परळी तालुक्यातील वाघबेट परिसरात त्यांनी शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सोयाबीनसह विविध पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये नुकताच दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा : अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंच्या वाढदिवशी फडणवीसांची पोस्ट; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण

पीएम किसान योजनेतील मदतीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार 

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम एकरकमी मिळावी, अशी मागणी मुंडे यांच्याकडे केली. गेल्या वर्षीची पीक विम्याची रक्कमही काही शेतकऱ्यांची बाकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर पीक विम्याची रक्कम एकरकमी मिळावी, यासाठी आपला प्रयत्न असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. पीक विम्याची रक्कम आणि एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणारी मदत मिळण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया आणि त्यानंतरचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे त्याआधी तात्काळ काही मदत करता येते का, याबाबत आपण मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पीएम किसान योजनेतील मदतीबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

पाण्याचा प्रश्न शहरांमध्येही निर्माण होऊ शकतो

यंदा खरीपाचे पीक पूर्णपणे गेले असून पुढील काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचे मुंडे यांनी सांगितले. एक ते सव्वा महिन्यात जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पाण्याचा प्रश्न केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित राहणार नसून शहरांमध्येही निर्माण होऊ शकतो. खरीपाचे पीक गेल्यानंतर रब्बीच्या पिकाचा विषय पुढे येईल, मात्र सध्या पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा या प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.