शिंदेंनी बिहारला जाण्याआधी दिल्लीला का केली वाट वाकडी? म्हणाले, 'मी रडणारा नाही तर लढणारा...' तुम्ही क्रोनोलॉजी घ्या समजून!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली गेले आणि त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. जिथे त्यांनी राज्यातील भाजप नेतृत्त्वाबाबत तक्रार केली जात असल्याचं बोललं जात आहे. जाणून घ्या सगळ्या प्रकरणाची क्रोनोलॉजी काय आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: महाराष्ट्रात सध्या महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये काहीच आलबेल नाही. दोन्ही पक्ष एकमेकांचे नेते फोडून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करत आहे. पण याच गोष्टींची थेट तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता अमित शाह यांच्याकडे केली असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं आहे. पण अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी मात्र आपण अशी कोणतीही तक्रार केली नसल्याचं म्हटलं आहे.
बिहारच्या शपथ विधी सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण थेट बिहारला जाण्याआधी वाट वाकडी करत शिंदेनी आधी दिल्ली गाठली आणि शाहांची भेट घेतली.
या भेटीनंतर शिंदे म्हणाले की, 'तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा हा एकनाथ शिंदे नाहीए. हा रडणारा नाही तर लढणारा आहे.' असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे महाराष्ट्र भाजप नेतृत्वाची तक्रार केली नसल्याचा दावा यावेळी केला.
दिल्लीत पत्रकारांच्या थेट प्रश्नांना एकनाथ शिंदेंचं नेमकं काय उत्तर?
'बिहारमध्ये उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्याचं निमंत्रण मलाही आहे. त्यामुळे त्याआधी बिहारच्या यशाचं अभिनंदन करण्यासाठी मी गृहमंत्री अमित शाहांना भेटलो.. अतिशय चांगली चर्चा झाली, त्यांचं अभिनंदन केलं.'










