'अदाणी-अंबानीच्या हातात गणपती देऊन, आम्ही गरबा बघायचा का?', मनसे नेते लालबाग आणि चिंतामणी मंडळावर संतापले!
गणेशोत्सवातील कॉर्पोरेट हस्तक्षेप आणि मोठ्या गणेशमूर्तींच्या स्पर्धेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि अदानी-अंबानींच्या सहभागावर त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले.
ADVERTISEMENT

मुंबई: गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असतानाच मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांमध्ये उद्योगसमूहांचा वाढता सहभाग आणि मोठ्या मूर्तींच्या स्पर्धेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मातीतला सण असून, तो कॉर्पोरेट वॉरचा भाग बनता कामा नये, अशी भूमिका देशपांडे यांनी मांडली.
लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचा उद्योगसमूहांशी झालेला करार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कॉर्पोरेट स्पर्धेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “गणेशोत्सव हा आमचा सण होता. कॉर्पोरेट वॉरचा भाग ही जर गणेशोत्सव मंडळं होत असतील, तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही,” असं देशपांडे म्हणाले.
‘उद्या गणपतीमध्ये गरबा बघायचा का?’
गणेशोत्सवातील वाढत्या कॉर्पोरेट सहभागावर टीका करताना देशपांडे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. “उद्या काय, अदानी आणि अंबानींच्या हातात गणपती देऊन उद्या काय आम्ही गणपतीमध्ये गरबा बघायचा का?” असा सवाल त्यांनी केला.
हे ही वाचा>> मुंबई : गणपती आगमनाला गालबोट, भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू; काय घडलं?
''गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी पैसे लागतात, हे मान्य.. पण किती पैसे लागतात तुम्हाला? भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मंडळांना देणग्या येतात. आज लालबागच्या राजामध्ये करोडो रुपये जमा होतात ना? लोक स्वतः येऊन तुम्हाला देणग्या देतात. मग कशाला तुम्हाला अंबानी पाहिजे?” असा सवाल त्यांनी केला.
