'वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर...', ओमराजे निंबाळकरांबाबत राऊतांनी उडवून दिली खळबळ
'वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत या.. अशा प्रकारचा दबाव ओमराजे निंबाळकरांवर टाकण्यात आला आणि त्यामुळेच त्यांनी आमची साथ सोडली.' असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्यासह आणखी पाच खासदार शिंदे गटात जाणार असल्याचे वृत्त समोर येत असतानाच ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी विशेषत: खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप करत या संपूर्ण घडामोडींना नवे राजकीय वळण दिले आहे.
संजय राऊतांचा थेट आरोप
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दावा केला की, ओमराजे निंबाळकर यांना शिंदे गटात आणण्यासाठी मोठी राजकीय डील करण्यात आली. त्यांनी आरोप केला की, निंबाळकर यांच्या वडिलांशी संबंधित एका न्यायालयीन प्रकरणाच्या निकालाचा वापर दबावाचे साधन म्हणून करण्यात आला आणि त्यातूनच हा राजकीय निर्णय घडवून आणण्यात आला.
हे ही वाचा>> Operation Tiger Live Updates : ठाकरे गटात फूट पक्की! 6 बंडखोर खासदारांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
राऊत म्हणाले की, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल हा काल (16 जून) लागणार होता. मात्र अचानक तो 20 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, याच गोष्टीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप ओमराजे निंबाळकरांवर केले आहे. ते म्हणाले 'पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल हा ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने लावू अशी ऑफर दिली गेल्याने त्यांनी आमची साथ सोडली. हा विचारांचा किंवा विकासाचा प्रश्न नाही. ही पूर्णपणे राजकीय डील आहे. सत्ता, दबाव आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचे खासदार तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.'
काय आहे 'ऑपरेशन टायगर'?
शिवसेना UBT पक्षाचे खासदार फोडाफोडीच्या या सगळ्या मोहिमेला "ऑपरेशन टायगर" असे नाव दिले गेले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील काही खासदार नाराज असल्याची माहिती समोर येत होती. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने या नाराज खासदारांना आता आपल्या गळाला लावलं असल्याचं सांगितलं जात आहे.









