तंबू उखडून फेकला, जंतर-मंतरवर रात्री भेदरलेल्या 'त्या' तरुणी
Jantar Mantar CJP protest : जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळ पोलिसांनी पूर्णपणे हटवत तंबू आणि स्टेज उखडून टाकले. आंदोलनातील तरुण-तरुणींनी लाठीमार, पाणीबंदी आणि गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तंबू उखडून फेकला
जंतर-मंतरवर रात्री भेदरलेल्या 'त्या' तरुणी
Jantar Mantar CJP protest : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याआधीच काल रात्रीपासून आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलकांनी संसदेकडे कूच केल्यानंतर दिल्लीतील अनेक भागांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि दगडफेकीच्या घटनांदरम्यान जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळही पूर्णपणे रिकामे करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनासाठी उभारलेला स्टेज, तंबू आणि इतर साहित्य हटवून संपूर्ण परिसर बॅरिकेड्सने बंदिस्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन सुरू होते, त्या ठिकाणी आता कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
"आंदोलकांनी कोणतीही हिंसा केली नसतानाही पोलिसांची कारवाई"
मुंबई Tak ने रात्री जंतर-मंतर परिसरात उपस्थित असलेल्या आंदोलकांशी संवाद साधला. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, सकाळपासूनच आंदोलनस्थळी पाणी पोहोचू दिले गेले नाही. फूड स्टॉल्स, औषधांचे स्टॉल आणि इतर व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आल्या. एका तरुणीने पोलिसांकडून विनाकारण लाठीमार झाल्याचा आरोप केला. आंदोलनात सहभागी असलेल्या दोन मुली बेशुद्ध पडल्याचे, एका मुलीचा चष्मा फुटल्याचे तसेच अनेकांना दुखापत झाल्याचे तिने सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार, बाहेरून काही लोक दगडफेक करत असतील, तरी त्याचा फटका आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. आंदोलकांनी कोणतीही हिंसा केली नसतानाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा दावा तिने केला.
महिला आंदोलकांशी गैरवर्तन झाल्याचा आरोप
संवादादरम्यान काही आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी आंदोलनस्थळी पाणी नेण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप केला. एका विद्यार्थिनीने आपण मध्य प्रदेशातून केवळ आंदोलनासाठी आल्याचे सांगितले. तिने स्वतःला ताप आणि सर्दी असतानाही आंदोलनात सहभागी झाल्याचे नमूद केले. काही आंदोलकांनी महिला आंदोलकांशी गैरवर्तन झाल्याचा आणि लाठीमारात महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप केला. त्याचवेळी पोलिसांचे म्हणणे असे असल्याचेही सांगण्यात आले की, आंदोलक आक्रमक होत होते. मात्र या आरोपांवर पोलीस अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, जंतर-मंतर परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात असून संपूर्ण आंदोलनस्थळ बॅरिकेड्सने बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी उपोषण किंवा आंदोलन करणे शक्य नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अभिजीत दीपके हे अजूनही आंदोलनस्थळी ठाण मांडून असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन तीन मागण्या मांडल्या असून, सोनम वांगचुक यांची सुटका, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि नीट परीक्षेशी संबंधित आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नसल्याचे सांगण्यात आले असून, पुढे आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










