BJP महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह बोलला, भाजपच्या नेत्याला अटक
कथित ऑडियो क्लिप प्रकरणी भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
BJP महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह बोलला
भाजपच्या नेत्याला अटक
BJP Leader Vijay Chaudhary Arrested : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय वसंतलाल चौधरी यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने गुरुवारी (6 ऑगस्ट) धुळे येथून अटक केली आहे. चौधरी यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करणे आणि अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा गंभीर आरोप असून, याप्रकरणी त्यांच्याविरोधात संबंधित कायदेशीर कलमांसह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये
गेल्या महिनाभरापासून विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या क्लिप्समध्ये अनेक राजकीय नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा दावा केला जात आहे. या कथित संभाषणात डॉ. विजयकुमार गावित, डॉ. हीना गावित, रक्षा खडसे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यासह इतरही काही प्रमुख नेत्यांची नावे असल्याची चर्चा आहे; मात्र या ऑडिओ क्लिप्सची तांत्रिक सत्यता अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेली नाही.
हे ही वाचा : शिंदेंवर नाही तसली टीका, प्रेसनंतर लगेच जरांगेंना फोन, जे जे बोलले ते सगळं ऐका!
धुळ्यातून अटक
या प्रकरणात रोहन शरद गावित यांनी यापूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी एका महिलेनेही स्वतंत्र फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली. गुन्हा दाखल झाल्यापासून विजय चौधरी हे जिल्ह्याबाहेर गेल्याचे सांगण्यात येत होते. अखेर 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी एलसीबीच्या पथकाने शोध घेऊन धुळे येथून त्यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. त्यांना लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हे ही वाचा : 'तू त्याच्यासोबत का बोलतेस?' 17 वर्षीय मैत्रिणीचा घरात घुसून चिरला गळा अन्...
कुटुंबियांची चौकशी
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी विजय चौधरी यांच्या कुटुंबीयांशी आणि निकटवर्तीयांशीही चौकशीसाठी संपर्क साधल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण वादग्रस्त प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता, त्यामागचे मूळ कारण आणि सर्व तांत्रिक बाबींचा पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत.
